देहूरोड – देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईतांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. यामधील एकाला दोन वर्षांसाठी, तर दुसऱ्याला सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
रोहित उत्तम अलकोंडे (वय 29, रा. दुर्गा मंदिरमागे, गांधीनगर, देहूरोड) आणि जाफर महबूब शेख (वय 28, रा. जामा मशीदजवळ, आंबेडकरनगर, देहूरोड) अशी सराईतांची नावे आहेत.
अलकोंडे याच्याविरूध्द गंभीर दुखापत करणे, दंगल घडवून वाहनांची तोडफोड करणे, सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत करणे, अशा गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
जाफर शेख याला खुनाच्या गुन्ह्यात 2017 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. जामीनावर बाहेर असताना खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे. त्यामुळे त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे, अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली.
शहरातील आणखी काही सराईतांवर तडीपारीच्या कारवाईची टांगती तलवार असून, त्यांच्यावरही नजीकच्या काळात कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.