मस्कत – रिची बॅरिंगटनची आक्रमक फलंदाजी व त्यानंतर गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर स्कॉटलंडने पापुआ न्यु गिनी (पीएनजी) संघाचा 17 धावांची पराभव केला. या विजयाच्या जोरावर स्कॉटलंडने दोन विजयांसह सुपर 12 गटांतील प्रवेश निश्चित केला आहे.
आता त्यांची या फेरीत यजमान ओमानशी येत्या गुरुवारी लढत होणार असून त्यात विजय मिळवला तर ते गटात अव्वल ठरणार आहेत. स्कॉटलंडचा कर्णधार केल कोएत्झरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात मात्र खराब झाली. खुद्द कर्णधार कोएत्झर व जॉर्ज मुनसे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मॅथ्यू क्रॉस व रिची बॅरिंगटन यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने आक्रमक फलंदाजी करत पीएनजीच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. क्रॉस आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही.
तो 36 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार यांच्या मदतीने 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर बॅरिंग्टनने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 70 धावांवर बाद झाला. त्याने 49 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर मात्र, त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली व त्यांचा डाव 20 षटकांत 9 बाद 165 धावांवर रोखला गेला.
विजयासाठी 166 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पीएनजी संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांना स्कॉटलंडच्या गोलंदाजांसमोर एकेक धाव घेतानाही यश येत नव्हते. त्यांचे 6 फलंदाज डावातील 12 व्या षटकांत फलकावर केवळ 67 धावा असताना बाद झाले. त्यावेळी ते संघाच्या धावसंख्येचे शतकही करतील का असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचवेळी नॉर्मन वेनुआ, सेसे ब्यु, किप्लीन दोरीगा व कॅड सोपर यांनी जिद्दी फलंदाजी करत स्कॉटलंडला तोडीस तोड उत्तर दिले.
त्यांनी हा सामना अंतिम षटकापर्यंत रोमहर्षक ठरवला. मात्र, केवळ अनुभव कमी पडल्याने तसेच प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांचा डाव 19.3 षटकांत 148 धावांवर संपुष्टात आला व त्यांना 17 धावांची निसटता पराभव स्वीकारावा लागला. स्कॉटलंडकडून जोश डेव्हीने 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
स्कॉटलंड – 20 षटकांत 9 बाद 165 धावा. (रिची बॅरिंगटन 70, मॅथ्यू क्रॉस 45, काबुआ मोरेआ 4-31, कॅड सोपर 3-24). पापुआ न्यु गिनी – 19.3 षटकांत सर्वबाद 148 धावा. (नॉर्मन वेनुआ 47, सेसे ब्यु 24, किप्लीन दोरीगा 18, कॅड सोपर 16, जोश डेव्ही 4-18).