दुबई – लहान वयात मुले हट्ट करतात. त्यातील सर्वात मोठी मागणी असते म्हणजे नवे कपडे. मात्र, स्कॉटलंडच्या रिबेका डाऊनी या अवघ्या बारा वर्षांच्या मुलीने चक्क देशाच्या क्रिकेट संघाची जर्सी तयार केली. तिने दाखवलेले डिझाईन स्कॉटलंड क्रिकेट मंडळाला पसंत पडले व त्यांनी चक्क टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या स्कॉटलंड संघासाठी हेच डिझाईन वापरून जर्सी तयार केल्या.
रिबेकाने स्वतःच्या देशाच्या क्रिकेट किटची (जर्सी) रचना करून एक विक्रम साकार केला. स्कॉटलंड क्रिकेट मंडळाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये रिबेकाचा व तिने तयार केलेल्या जर्सीचाही फोटो पोस्ट केला आहे.
सध्या या फोटोला लाखो लाईक्स मिळत अशून रिबेकाचे कौतुकही होत आहे. हॅडिंग्टनमध्ये राहात असलेल्या रिबेकाने आजवर आपल्या देशाचा प्रत्येक सामना टीव्हीवर पाहिला आहे. त्याचवेळी तिला एक डिझाइन सुचले व तिने त्याची तयारी केली. त्यानंतर तिने स्कॉटलंड क्रिकेट मंडळाशी संपर्क साधून त्यांना ही जर्सी दाखवली.
त्यावेळी मंडळातील सगळ्याच सदस्यांनी ती पसंत केली व खेळाडूंना हीच जर्सी या स्पर्धेत परिधान करून सहभागी होण्यास सांगितले. खेळाडूंनीही हीच जर्सी परिधान करून या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. जांभळ्या व काळ्या रंगाची रचना करून जर्सीवर एका बाजूला स्कॉटलंडचे नाव व आयसीसीचा विश्वकरंडक लोगोही लावण्यात आला आहे.