ICC Men’s Player T20 Rankings : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेनंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. याचा फायदा टीम इंडियाचा खेळाडू अक्षर पटेलला झाला आहे. त्याने मोठी झेप घेतली आहे. अक्षरने गोलंदाजांच्या T20 क्रमवारीत अव्वल 5 मध्ये पोहोचला आहे. रवी बिश्नोई यांना क्रमवारीत फटका बसला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या सुपर ओव्हरमध्ये त्याने शानदार गोलंदाजी केली होती. मात्र, तरीही त्याची क्रमावारीत घसरण झाली आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत अक्षर पटेलने सर्वाधिक बळी घेतले होते. त्याने दोन सामन्यांत 4 बळी घेतले. आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अक्षरने टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. अक्षरला 12 स्थानांचा फायदा झाला आहे. तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत आदिल रशीद अव्वल स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिजचा गोलंदाज अकील हुसेन दुसऱ्या स्थानावर आहे. वानिंदू हसरंगा याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
रवी बिश्नोईने नुकतीच सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना बेंगळुरू येथे खेळला गेला. टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या. पहिली सुपरओव्हर टाय झाली. यानंतर दुसरी सुपर ओव्हर झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताच्या 11 धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानला एक धाव करता आली आणि भारताने सामना जिंकला. यामध्ये बिश्नोईकडे गोलंदाजी सोपविण्यात आली होती. त्याने तीन चेंडूत फक्त 1 धाव देत 2 बळी घेतले. तरीही गोलंदाजी क्रमवारीत बिश्नोईला फटका बसला आहे. तो दुसऱ्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानावर घसरला आहे. त्याला 4 स्थानांचा फटका बसला आहे.
दरम्यान, अक्षरने भारतासाठी आतापर्यंत 52 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत 49 विकेट्स घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्येही त्याने 361 धावा केल्या आहेत.