शिरूर – शहरात वाढता करोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता शिरूर नगरपरिषदेच्या वतीने धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील पुनम स्वीट हे दुकान सील केले तर सुपर बाजार व अंबिका हॉटेल यांच्यावर भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.
शिरूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्ण आढळत आहे. नागरिक हॉटेल दुकानदार विविध आस्थापना याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत अनेकवेळा नगरपरिषदेच्या वतीने महसूल खात्याच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगूनही कुठलाही परिणाम झालेला नाही.
परिणामी बाधित आता सर्वच भागात रोजच वाढताना दिसून येत असल्याने नगरपरिषद हद्दीत मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह भरारी पथकप्रमुख रवींद्र वारे, उत्तम कांबळ, नगरपरिषद कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेले पथके विनामास्क फिरणारे नागरिक, हॉटेल, स्वीट, कपड्याची दुकाने, किराणा दुकाने यांसह सर्व आस्थापना नियमांचे पालन करीत नाही त्यांच्यावर कारवाई करीत आहे.
शहरात सुपर बाजार व अंबिका हॉटेल दंडात्मक कारवाई करून सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर पूनम स्वीट या दुकान सील करण्यात आले आहे. तसेच इतर सहा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. सहा दुकानदारांना नोटीसही दिल्या असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. रात्री 10 नंतर सर्व आस्थापना बंद ठेवाव्यात अन्यथा कारवाई होऊ शकते. नोटिसा व सांगून न ऐकणाऱ्या दुकानदारांवर दुकान सील करण्यात येतील, असा इशारा महेश रोकडे यांनी दिला आहे.