सुशिक्षित बेरोजगारांना संधी : 3 हजार 650 रिक्त जागांसाठी होतेयं भरती प्रक्रिया
पिंपरी – भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने भरती होणार आहे. राज्यातील डाक सेवकांच्या रिक्त 3 हजार 650 जागांसाठी होत असलेल्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी इच्छुक तरुण अर्ज भरणा केंद्र तसेच इंटरनेट कॅफेवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र पिंपरी-चिंचवड शहरात पहायला मिळत आहे.
डाक विभागामध्ये डाक सेवक पदासाठी यावर्षी रिक्त जागेवर मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. राज्यातील विविध विभागासाठी ही भरती प्रक्रिया होत असल्याने सर्वच भागातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत आहेत. या पदाकरिता दहावी उतीर्ण आवश्यक आहे. विशेष म्हणजे या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार नसून फक्त दहावीच्या गुणवत्तेनूसार निवड करण्यात येणार आहे.
पोस्टाने निवड करताना उमेदवारास केवळ संगणाचे ज्ञान व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याची अट घातली आहे. त्यामुळे, या पदासाठी अर्ज दाखल करण्याऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच अर्जदार हा 18 ते 40 वयोगटातील असणे बंधनकारक करण्यात आले असून ओबीसी प्रवृर्गातील अर्जदारासाठी 3 वर्ष, एससी-एसटी प्रवृगातील अर्जदारासाठी 5 वर्षे आणि अपंगासाठी 10 वर्षे वयाची अट शिथील करण्यात आली आहे.
अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी व ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन पोस्ट खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
उच्चशिक्षितांचेही अर्ज
डाकसेवक पदासाठी केवळ दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असतानाही सध्या राज्यात होत असलेल्या भरतीप्रक्रियेसाठी उच्चशिक्षीत उमेदवारही अर्ज करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून डीएड, बीएड उत्तीर्ण झालेल्या अनेकांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. दहा हजार ते 14 हजार 500 रुपये अशी वेतणश्रेणी या पदासाठी लागू असणार आहे.
पोस्टामध्ये डाकसेवक पदासाठी भरती निघाली आहे. त्यामुळे, मागील काही दिवसापासून या पदासाठी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण येत आहेत. अत्तापर्यंत शेकडो अर्ज भरलेले आहेत. अर्ज भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत असल्याने पुढील काही दिवसात आणखी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे.
– सिकंदर शेख, इंटरनेट कॅफे चालक