चावण्याच्या 827 घटना : नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
पुणे – शहरात मोकाट डुकरे आणि कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यात महापालिकेस अपयश येत असल्याने श्वानदंशांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच आता शहरात मांजरे आणि माकडांच्या चावण्याच्या घटनाही लक्षणीय वाढल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर 2019 या 9 महिन्यांत शहरात मांजर दंशाच्या 768, तर 59 माकडदंशाच्या घटना घडलेल्या आहेत. या शिवाय, इतर जंगली प्राणी तसेच दंशाच्या तब्बल 319 घटनाही समोर आल्या आहेत.
राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये श्वानदंश तसेच इतर प्राण्यांच्या दंशानंतर रेबीज लसीकरण केले जाते. हे लसीकरण मोफत केले जाते.
त्या अंतर्गत गेल्या 9 महिन्यांत शहरात भटकी कुत्री, पाळीव प्राणी, मांजर, माकड तसेच इतर दंशाच्या सुमारे 9 हजार 699 घटना घडल्या आहेत. त्यात सर्वाधिक 6,581 घटना भटक्या कुत्रांच्या दंशाच्या असून 1,972 घटना पाळीव कुत्र्यांच्या चावण्याच्या आहेत.
आता मांजरी पकडण्याचीही मोहीम!
मोकाट कुत्र्यांसोबतच शहरात मांजरांचा उपद्रव सुरू असल्याने केंद्राच्या सूचनांनुसार, मांजर पकडण्यासाठी आणि त्यांचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तर माकडे दंशाच्या घटनांनंतर वन आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने हे लसीकरण केले जात आहे.
मांजर व माकडांचा उपद्रव वाढला
शहरात माकड चावण्याच्या सर्वाधिक 26 घटना फेब्रुवारीत घडल्या असून त्या पाठोपाठ मे आणि ऑगस्टमध्ये अनुक्रमे 9 आणि 7 घटना घडल्या आहेत. तर जानेवारीत 6 घटना घडल्या असून मार्च, एप्रिलमध्ये प्रत्येकी 3 तर जून, जुलैमध्ये प्रत्येकी 2 आणि सप्टेंबरमध्ये 1 घटना घडली आहे. तर मांजर चावण्याच्या सर्वाधिक 121 घटना ऑगस्टमध्ये समोर आल्या असून जुलैमध्ये 104 तर जानेवारीत 101 घटना घडल्या आहेत. तर इतर महिन्यांमध्ये सरासरी 50 ते 80 घटना घडल्याचे समोर आले आहे.