कल्याणमध्ये सीएचा संशयास्पद मृत्यू

कल्याण – कल्याणसमीप असलेल्या टिटवाळा रेल्वे रुळाजवळ एका सीएचा मृतदेह आढळून आला. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू असताना तो आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सागर देशपांडे असे सीएचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या केली की घातपात झाला याचा तपास करण्यात येत आहे.

कल्याणजवळच्या टिटवाळ्यात 12 ऑक्‍टोबर रोजी एका अज्ञात व्यक्‍तीचा मृतदेह रेल्वे रुळाच्या बाजूला आढळून आला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी एडीआर दाखल करत पुढील तपास सुरू केला. सदर मृतदेहाची ओळख पटण्यासाठी त्याचे फोटो राज्यभरात पाठविण्यात आले.

अखेर आज त्या व्यक्‍तीची ओळख पटली. हा व्यक्‍ती 11 ऑक्‍टोबरपासून बेपत्ता होता. ठाण्यातील नवापाडा पोलीस ठाण्यात या व्यक्‍तीची मिसिंगची रिपोर्ट दाखल आहे. नातेवाईक सहा दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. सागर हे एका मोठ्या कंपनीत सीए होते.

सागर देशपांडे यांची एका प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेत चौकशी सुरू आहे. मात्र, हा तपास सुरू असल्याने सागर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु त्यांचा अपघाती मृत्यू झाला की, त्यांच्यासोबत घातपात झाला आहे, या तिन्ही अंगाने पोलीस तपास सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.