Sushilkumar Shinde BJP offer – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकामागून एक भूकंप सुरूच आहेत. असं असतानाच आणखी एका भूकंपाची चाहूल सध्या लागली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू जरी सोलापूर असणार असला तरी त्याचे कंप दिल्लीपर्यंत जाणवणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरात सुरुवात होत असतानाच, महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का बसला. हा धक्का होता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्या पक्षांतराचा.
योगायोग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले होते.
आता, शुक्रवारी म्हणजेच १७ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. सोलापूर येथे एका उदघाटनाच्या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान मोदी येत आहेत. यावेळी मात्र मोदी येण्यापूर्वीच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे.
याला निमित्त ठरला आहे, माहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा दावा. सुशीलकुमार शिंदे यांनी, भाजपने आपल्याला व आपल्या कन्येला दोनदा ऑफर दिल्याचं सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्या या दाव्यानंतर भाजप नेत्यांनी देखील, आमच्याकडे चांगल्या नेत्यांचे स्वागतच असल्याचं म्हणत प्रतिसाद दिला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट देखील घेतली आहे.
शिंदेंचे दबावतंत्र? | Sushilkumar Shinde BJP offer
लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. जागावाटपाच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये व इंडिया आघाडीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत.
‘वंचित’ला महाविकास आघाडीत स्थान मिळाल्यास त्यांच्याकडून सोलापूरच्या जागेवर दावा केला जाऊ शकतो. २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी, सोलापूर येथूनच लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
प्रकाश आंबेडकर यांना या निवडणुकीत १ लाख ७० हजार मतं मिळाली होती. सुशीलकुमार शिंदेंच्या पराभवात ही मतं निर्णायक ठरल्याचं विश्लेषण त्यावेळी अनेकांनी केलं होत.
सुशीलकुमार शिंदे यांना सोलापुरातून २०१४ व २०१९ अशा दोन वेळेस पराभव स्वीकारावा लागला आहे. अशात वंचित बहुजन आघाडी माहाविकास आघाडीत सामील झाली तरी सोलापूरची जागा आपल्याचकडे राहावी यासाठी सुशीलकुमार शिंदे दबावतंत्राचा वापर करत आहेत काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार मिलिंद देवरा हे देखील आपला लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपामध्ये शिवसेनेला जात असल्याने नाराज असल्याचं बोललं जातं. याच कारणास्तव त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचीही चर्चा आहे.
अशातच, सुशीलकुमार शिंदे यांच्या भाजप ऑफरच्या उल्लेखामागे देखील आघाडीचे संभाव्य जागावाटपच आहे की आणखी काय हे येणारी वेळच सांगणार आहे.
गांधी परिवाराचे विश्वासू | Sushilkumar Shinde BJP offer
सुशीलकुमार शिंदे यांची ओळख काँग्रेस पक्षामध्ये गांधी घराण्याचे विश्वासू अशी आहे. काँग्रेस नेतृत्वाने देखील शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना अनेक महत्वपूर्ण पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे गृहमंत्री अशी महत्वपूर्ण पदे त्यांनी भूषवली आहेत.
अशात सुशीलकुमार शिंदे यांनी देखील काँग्रेसचा हात सोडल्यास, भाजपवासी झालेल्या गांधी घराण्याच्या विश्वासूंच्या यादीत वाढच होणार आहे.
भारत जोडो न्याय यात्रेचे वंचितला आमंत्रण
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे आमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देण्यात आले होते. मात्र ‘वंचित’तर्फे आपण इंडिया आघाडीचा घटक नसून या यात्रेत सहभागी झाल्यास चुकीचा संदेश जाईल असं सांगण्यात आलं. आम्हाला आधी इंडिया आघाडीचे निमंत्रण द्या असेही ‘वंचित’ने सूचित केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
“..तरच भारत जोडो यात्रेत सामिल होऊ” राहुल गांधींना पत्र लिहीत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
“मला आणि प्रणितीला दोन वेळा भाजपाची ऑफर” सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,”मीडियाच्या माध्यमातून..”