Sushilkumar shinde : राहुल गांधी यांची ‘भारत न्याय यात्रा’ सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देखील मोठे विधान केले आहे. ‘मला आणि प्रणिती शिंदेला दोन वेळा भाजपाची ऑफर मिळाली’, असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या या दाव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रणिती शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे यांना अशी भाजपकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या जात आहेत. अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सोलापूर दौऱ्यावर आले. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
भेट होणं ही गोष्ट वेगळी आहे. सुशीलकुमार शिंदे आणि माझी ही दोन-तीन वेळा भेट झाली आहे. पण ती गोष्ट वेगळी आहे असं देखील बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सुशील कुमार शिंदे काय म्हणाले ?
सुशील कुमार शिंदे म्हणाले की, “भाजपचे काही नेते मला आणि प्रणितीला भाजपामध्ये या म्हणून सांगत होते. पण ते कसं शक्य आहे. ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो, जिथे आमचे बालपण गेले, जिथे आम्ही वाढलो. आता मी ८३ वर्षांचा झालो, आता कसं दुसऱ्याशी घरोबा करणार? हे शक्य नाही. प्रणितीबद्दल तुम्हाला माहितीच आहे, ती पक्ष बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही.”
शिंदे पुढे म्हणाले, “भाजपकडून मला आणि प्रणिती शिंदेला दोन वेळा ऑफर दिली आहे. माझा दोन वेळा पराभव होऊनही मला ऑफर दिली जाते. माझे संपुर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मी हा निर्णय कसा काय घेऊ शकतो,” असेही ते म्हणाले. सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसच्या स्नेहसंमेलन सोहळ्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते.