Gyanvapi Case – वाराणसीतील ग्यानवापी मशिदीतील शिवलिंगांचे पुरातत्व खात्यामार्फत सर्वेक्षण केले जावे अशी मागणी करणारी याचिका हिंदु पक्षातर्फे आज सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व खात्यामार्फत याचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला जावा आणि हा भाग खुला करण्यात यावा अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
ग्यानवापी मशिदीत वजुखाना विभागात हे प्राचीन शिवलिंग असल्याचा हिंदु पक्षाचा दावा आहे. मात्र सन २०२२ मध्ये हा वजुखाना भाग बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तो भाग खुला करण्यात यावा अशी मागणी या याचिकेत आहे.
तथापि हे शिवलिंग नसून पाण्याचे दगडी कारंजे आहे असे मुस्लीम बाजूचे म्हणणे आहे. मात्र हे आदि विश्वेश्वराचे शिवलींगच आहे असे हिंदु बाजूचे ठाम म्हणणे आहे. ही बाब पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणातच समोर आली असून आता त्याचे शास्त्रीय सर्वेक्षण होणे गरजेचे आहे असे हिंदु बाजूचे म्हणणे आहे.
या संकुलाच्या संबंधात विश्व हिंदु परिषदेचा दावा आहे की या भागात जे प्राचीन भव्य मंदिर होते ते पाडून तेथे मशिद बांधण्यात आली आहे ही बाबही पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याने हे संकुल आता हिंदुंच्या ताब्यात दिले जावे.