नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैना याला मालदीव सरकारने स्पोर्टस आयकॉन पुरस्काराने सन्मानित केले आहे. मालदीव स्पोर्टस पुरस्कार 2022 या अंतर्गत रैनाला या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
या पुरस्काराच्या शर्यतीत रियल मॅड्रिडचा माजी खेळाडू रॉबर्टो कार्लोस, जमेकाचा धावपटू असाफा पावेल, श्रीलंकेचा माजी क्रिकेटर सनथ जयसूर्या आणि डच फुटबॉलमधील दिग्गज एडगर डेविड्स सहित 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. रैनाला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. त्यामुळे निराश झालेल्या रैनाच्या गुणवत्तेचा मालदीवने गौरव केला आहे.
रैना 2011 सालच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. तसेच तो आयपीएल स्पर्धेच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडूही होता.
चेन्नईने या स्पर्धेचे चार वेळा विजेतेपद पटकावले होते व त्यात रैनाच्या कामगिरीचाही मोठा वाटा होता. आयपीएलच्या कारकिर्दीत सर्वप्रथम 5 हजार धावांचा टप्पा पार करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला होता.