नारायणगाव : कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेडा व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी भाऊसाब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने नारायणगाव येथील प्रगतशील महिला शेतकरी हिराबाई किसन शेटे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वानखेडे, उपाध्यक्ष डॉ. गणेश जाधव व कृषी महाविद्यालय उमरखेडचे प्राचार्य सचिन चिंचले यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
प्रगतशील महिला शेतकरी हिराबाई शेटे गेल्या तीस वर्षापासून पिकांसाठी मार्गदर्शन करत असून नारायणगाव येथे शेती व नर्सरी व्यवसाय करीत आहेत. शेती व नर्सरीसाठी हिराबाई शेटे यांनी भारत, दुबई, इस्राएल, चीन देशाचे शेतीविषयक अभ्यास दौरे केले आहे. अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया,
नायजेरिया, जर्मन, हॉलंड देशातील अनेक परदेशी शेतकरी, कृषी अधिकारी यांनी त्यांच्या नर्सरीला भेट देऊन नर्सरीची माहिती घेऊन कौतुक केले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्थसंपदा पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश मेहेत्रे व संचालक मंडळाने हिरबाई शेटे यांचे अभिनंदन केले.