सातारा, (प्रतिनिधी)- सातारा लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने सुरेश कोरडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.
ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे आहेत. महाराष्ट्रात ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी बांधवांना व भगिनींना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी ही राजकीय संघटना स्थापन करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये ओबीसी संघटना या नावाने ती सामाजिक चळवळ म्हणून काम करत होती. महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे एकूण 23 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
जिल्ह्यातून सुरेश कोरडे यांना ओबीसी बहुजन पार्टीने संधी दिली आहे. ही संधी प्राप्त करून देण्यासाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे यांनी प्रयत्न केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना महाबळेश्वर ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष अनिल लोहार, सातारा जिल्हा ओबीसी बहुजन पार्टीचे महासचिव प्रमोद क्षीरसागर, माळी महासंघाचे कार्यकर्ते श्री. माळी, भरत लोकरे, श्री. जमदाडे उपस्थित होते.