Supriya Sule on Eknath Khadse: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे स्वगृही अर्थात भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. स्वत: एकनाथ खडसे यांनीदेखील माध्यमांशी बोलताना आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याची माहिती दिली. येत्या काही दिवसांत ते भाजपवासी असतील. खडसे यांच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला एकनाथ खडसेंबाबत काहीच माहिती नाही. त्यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ठीक नाही. आज सकाळीच रोहिनी खडसेंची भेट झाली होती. रोहिनी खडसे आणि मी जवळपास एक तास सोबत होतो. त्यांनी मला खडसेंची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबाची अडचण सुरु आहे. त्यांच्यावर स्ट्रेस आणि टेंशन आहे. त्यामुळे आम्हालाही एकनाथ खडसे यांची काळजी असते. रोहिनी खडसेंनी भाजप प्रवेशाबाबत काही भाष्य केलं नाही, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया –
एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये परतण्याच्या बातमीवर अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, “केवळ आपला पक्षच आपला असतो, याची जाणीव एकनाथ खडसे यांना झाली असेल, त्यामुळे ते पुन्हा भारतीय जनता पक्षात येत असतील. एकनाथ खडसे जर महायुती सोबत परत आले तर त्यामुळे कोणत्याच पक्षातील कोणीही नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. झाला तर एकनाथ खडसे यांच्यामुळे महायुतीला फायदाच होईल.”