मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार असल्याचे समजते आहे. यावर शरद पवारांची प्रकृती थोडी नाजूक असल्याची माहिती दिली असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले कि, कालपासून पवार साहेबांची तब्येत नरम आहे असे कळाले होते. मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हाही आम्ही त्याविषयी चर्चा केली. सकाळी सुप्रियाताईंकडून समजले की त्यांची तब्येत थोडी नाजूक आहे. त्यांना ८ ते १० दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यांच्यावर लहानशी शस्त्रक्रिया देखील करावी लागणार आहे. आम्ही प्रार्थना करतो की त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळो आणि आमच्यापेक्षा तरूण असलेले ते नेते पुन्हा आमच्यासोबत कामाला लागोत, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, शरद पवार यांना पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात तपासणी करण्यासाठी गेले होते. पण, पित्ताशयाचा त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ३१ मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पुढील २ आठवडे ते घरीच विश्रांती करणार आहे, या काळात त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.