सातारा, (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व शिवसेना शहरप्रमुख नीलेश मोरे यांना जिल्हा नियोजन समितीच्या निवडीतून डावलण्यात आल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पालकमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे समर्थकांची नियोजन समितीवर वर्णी लावल्याचा आरोप करून मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या निवडी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांसह शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव आणि चंद्रकांत जाधव यांची वर्णी लागली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक नीलेश मोरे यांचे नाव अचानक मागे पडले.
विधिमंडळ सदस्यांमधून आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह भाजपच्या निमंत्रित सदस्यांची नावे नियोजन समितीवर सुचवण्यात आली आहेत. नियोजन समितीवर या सदस्यांची कोणत्या निकषांवर निवड करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करत नीलेश मोरे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. सातार्यात मुख्यमंत्र्यांचे एकमेव संपर्क कार्यालय सुरू करून त्यांच्या प्रत्येक आदेशाची अंमलबजावणी करणार्या नीलेश मोरे यांनी करोना काळात अनेक प्रश्न मार्गी लावले होते. इतर समर्थकांच्या भाऊगर्दीत आपले नाव मागे पडल्याने नीलेश मोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.