म्हसवड, (प्रतिनिधी) – प्रशासकीय राजवटीत म्हसवड नगरपरिषदेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी गुरुवारी केला. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात धट यांनी म्हटले आहे की, पालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी डॉ. सचिन माने हे मनमानी कारभार करत आहेत.
आ. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून पाणीपुरवठा योजना नव्याने कार्यान्वित करणे, रस्ते दुरुस्ती, जलस्रोतांवर फिल्टर बसवणे, शहर सुशोभिकरण आणि अन्य विकासकामांचे नियोजन आहे. यापैकी काही कामे सुरू असली, तरी त्यांचा दर्जा सुमार आहे. ही विकासकामे शहराला नवीन ओळख निर्माण करून देणारी आहेत; परंतु डॉ. माने यांना त्याच्याशी काहीही देणघेणे नाही, असे दिसते. ते आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देत आहेत. त्यामुळे त्यांच्याभोवती नेहमीच ठेकेदारांचा गराडा पडलेला दिसतो.
आम्ही व आमचे नेते शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असताना, या कामांचा दर्जा पाहून संताप येतो. विकासकामे दर्जेदार करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, मुख्याधिकारी ही जबाबदारी विसरल्याचे दिसत आहे. पालिकेत बोगस बिले काढून शासनाची फसवणूक केली जात आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी आ. गोरे यांनी 80 कोटी रुपयांचा निधी आणला आहे.
मात्र, या कामाचे अक्षरश: तीन तेरा वाजले आहेत. या योजनेची मुख्य जलवाहिनी बदलणे गरजेचे असताना, मुख्य जलवाहिनीला जोडल्या जाणार्या अंतर्गत जलवाहिन्या बदलण्याचा सपाटा सुरू आहे. त्यासाठी रस्ते खोदण्यात आल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. वास्तविक मुख्य जलवाहिनी बदलली असती, तर पाणीपुरवठा विस्कळीत झाला नसता. मात्र, मुख्याधिकार्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शहराला 15 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
शहर स्वच्छतेसाठी देण्यात आलेल्या ठेक्यातही भ्रष्टाचार आहे. संबंधित कंपनीला देण्यात आलेली ठेक्याची रक्कम अव्वाच्या सवा आहे. दुसरी कंपनी अर्ध्या रकमेत हे काम करण्यास तयार असूनही, मुख्याधिकारी त्याचा विचार करत नाहीत. हीच स्थिती पालिकेला कंत्राटी कर्मचारी पुरवण्याच्या कामातही आहे. पालिकेत सामान्य जनतेला किरकोळ कामांसाठी नाडवले जात आहे. पथदिवे बदलण्याच्या कामातही गैरव्यवहार झाला आहे.
पालिका हे अधिकार्यांना पैसे खाण्याचे कुरण वाटत आहे. मुख्याधिकार्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर, पदोन्नतीने त्यांची बदली भिवंडी महापालिकेत उपायुक्तपदी झाली होती; परंतु ही बदली रद्द करून, ते पुन्हा म्हसवड पालिकेत रुजू झाले आहेत. त्यांच्या मनमानीला लगाम बसावा आणि विकासकामे नियमांप्रमाणे व्हावीत, यासाठी मी जनतेला सोबत घेऊन, दि. 20 पासून पालिकेसमोर आंदोलन करणार आहे, असा इशारा धट यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पाठवण्यात आल्या आहेत.