पाथर्डीतील देवस्थानांना सॅनिटायझरचा पुरवठा 

पाथर्डी  -करोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वतीने आज पाथर्डी तालुक्‍यातील श्री क्षेत्र मढी, श्री क्षेत्र भगवानगड तसेच श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, मोहटे या ठिकाणी मोफत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

आमदार रोहित पवार आणि बारामती ऍग्रो लिमिटेडच्या वतीने तालुक्‍यातील तिन्ही देवस्थानांना प्रत्येकी शंभर लिटर सॅनिटायझर मोफत पाठवले आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा रुग्णालय, आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय आस्थापना, राज्यातील सर्व प्रमुख देवस्थाने आणि विविध सामाजिक संस्था यांना त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी, परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षेसाठी संपूर्ण राज्यभरात सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी तालुक्‍यातील श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री,श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे विश्‍वस्त डॉ. ज्ञानेश्‍वर दराडे, श्री क्षेत्र मढी देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्याशी फोनवरून संपर्क करत उपक्रमाची माहिती दिली.

या सॅनिटायझरचे आज वाटप करण्यात आले. श्री क्षेत्र मोहटादेवी येथे विश्‍वस्त डॉ. ज्ञानेश्‍वर दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांच्याकडे हे सॅनिटायझर देण्यात आले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या प्रतिनिधीचे देवीचा फोटो, शाल, श्रीफळ, प्रसाद व आभारपत्र देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी पाथर्डी येथील व सध्या बारामती येथे कार्यरत असलेले आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय प्रा. हेमंत सुपेकर, उद्योजक विनायक बडे, दादा तळेकर, प्रा.लक्ष्मण खेडकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे योगेश वाळके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.तसेच श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान मढी येथे देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बबन मरकड आदी कर्मचारी उपस्थित होते.

तर भगवानगड येथे गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्याकडे हे सॅनिटायझर देण्यात आले.पाथर्डी व परिसरातील समस्त भाविकांच्या वतीने आ. रोहीत पवार यांचे विशेष आभार व्यक्त करताना राज्यभरात असलेल्या या अभिनव उपक्रमाचे स्वागत डॉ. ज्ञानेश्‍वर दराडे यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.