मुंबई : माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यामधील नेते आनंद परांजपे यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती येत आहे. आनंद परांजपे गेल्या काही दिवसांपासून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात होते. जितेंद्र आव्हाड यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, मात्र पूर्वकाळजी म्हणून सध्या ते कुटुंबासोत होम क्वारंटाइन आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले होते. जितेंद्र आव्हाड यांनी अधिकाऱ्यासोबत कायदा सुव्यवस्थेसंबंधी चर्चा केली होती. पण गेल्याच आठवड्यात या पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. या पोलीस अधिकाऱ्यावर मुंब्रा येथील तबलिगी जमातच्या सदस्यांची ओळख पटवण्याची जबाबदारी होती. अधिकाऱ्याने १३ बांगलादेशी आणि आठ मलेशियाचे अशा एकूण २१ जणांना नागरिकांना ताब्यात घेतलं होतं.
तबलिगी जमातच्या सदस्यांना क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. पण प्राथमिक चाचणीत सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण नेमकी झाली कशी हे स्पष्ट झालेले नाही. मुंब्रा येथील रहिवाशांपासून पोलीस अधिकाऱ्याला लागण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.