पुणे – वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकार व लेग स्पीन गोलंदाज अलाना किंग यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीसमोर ट्रेलब्लेझरचा डाव 9 बाद 114 धावांवर रोखत महिला चॅलेंज टी-20 क्रिकेट स्पर्धेत सुपरनोव्हाज संघाने विजयी सलामी दिली.
सुपरनोव्हाजने विजयासाठी दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रेब्लेझरकडून कर्णधार सलामीवीर स्मृती मानधनाने हेली मॅथ्यूजसह थाटात सुरुवात केली होती. मात्र, मॅथ्युज 18 धावा काढून परतली. त्यानंतर 23 चेंडूत 4 चौकारांसह 34 धावांवर संयमी खेळी करत असलेली मानधनाही बाद झाली.
त्यावेळी हरलीन देओलने घेतलेल्या सुरेख झेलाच्या जोरावर जेमिमा रॉड्रीग्ज 21 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 24 धावा काढून बाद झाली. त्यानंतर वेगवान गोलंदाज पूजा व लेग स्पीन गोलंदाज अलाना यांनी ट्रेलब्लेझरच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. रिंकू सिंगने नाबाद 14 धावा केल्या मात्र, तोपर्यंत ट्रेलब्लेझरचा पराभव निश्चित झाला होता. पूजा वस्त्रकारने 4 तर अलाना किंगने 2 गडी बाद केले.
तत्पूर्वी, सुपरनोव्हाज संघाने मर्यादित 20 षटकांत सर्वबाद 163 धावा केल्या. सुपरनोव्हाजची कर्णधार हरमनने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर डॉटीनने पुनियाच्या साथीत संघाला अर्धशतकी शलामी दिली. डॉटीन अनावश्यक फटका मारून 17 चेंडूत 5 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 32 धावांवर परतली.
पुनिया आक्रमक खेळत असताना 20 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना 22 धावा काढून बाद झाली. त्यानंतर हरलीनने हरमनला सुरेख साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. हरलीन स्थिरावलेली असतानाही 35 धावांवर पायचीत झाली. तीने 19 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार फटकावले. एका बाजूने हरमन संयमी खेळ करत होती. सुन लुसला अपयश आल्याने त्यांना वेगाने धावा करता
आल्या नाहीत.
अलाना किंग व सोफी एक्केलस्टोन यांनीही साफ निराशा केली. पूजा वस्त्रकारने 14 धावा करत हरमनच्या साथीत संघाला दीडशतकी धावांच्यापुढे मजल मारुन दिली. हरमनही 19 व्या षटकांत 37 धावांवर बाद झाली. तिने या खेळीत 29 चेंडूत 4 चौकार मारले. ट्रेलब्लेझरकडून हेली मॅथ्युजने सर्वाधिक 3 गडी बाद केले. सलमा खातूनने 2 बळी मिळवले. राजेश्वरी गायकवाडने 1 गडी बाद केला.
WHAT. A. WIN! 👏 👏
The @ImHarmanpreet-led Supernovas seal a clinical 4⃣9⃣-run victory over Trailblazers & pocket two points. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/vQJxXerxRh
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022
संक्षिप्त धावफलक
सुपरनोव्हाज – 20 षटकांत सर्वबाद 163 धावा. (हरमनप्रीत कौर 37, हरलीन देओल 35, डेंड्रा डॉटीन 32, प्रिया पुनिया 22, पुजा वस्त्रकार 14, हेली मॅथ्युज 3-29, सलमा खातून 2-30, राजेश्वरी गायकवाड 1-34). ट्रेलब्लेझर – 20 षटकांत 9 बाद 114 धावा. (स्मृती मानधना 34, जेमिमा रॉड्रीग्ज 24, हेली मॅथ्युज 18, पूजा वस्त्रकार 4-12, अलाना किंग 2-30).