पुणे – सलामीवीर शफाली वर्मा व मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज लॉरा वोल्व्हहार्ट यांनी केलेल्या अफलातून अर्धशतकी खेळीच्या जोरावर महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत वेलॉसिटी संघाने सुपरनोव्हाज संघाचा 7 गडी राखून पराभव केला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना सुपरनोव्हाज संघाने 20 षटकांत 5 बाद 150 अशी धावसंख्या उभारली होती. त्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने 71 धावांची आक्रमक खेळी केली. तिने या खेळीत 51 चेंडूत 7 चौकार व 3 षटकार अशी आतषबाजी केली. तिला साथ देताना तानिया भाटीयाने 32 चेंडूत 3 चौकारांसह 36 धावा केल्या. त्यानंतर सुन लुसने 14 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 20 धावा केल्या व संघाला दीडशतकी मजल मारून दिली. वेलॉसिटीकडून केट क्रॉसने सर्वाधिक 2 बळी घेतले.
विजयासाठी 151 धावांचा पाठलाग करताना नाथकाम चंथम लवकर बाद झाली. मात्र, शफाली वर्माने यस्तिका भाटीयाच्या साथीत संघाचा डाव सावरला व संघाचे अर्धशतक फलकावर लावले. यस्तिका 17 धावांवर बाद झाली. त्यावेळी शफालीही वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात 51 धावांवर बाद झाली. तिने आपल्या अर्धशतकी खेळीत 33 चेंडूत 9 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर आलेल्या लॉरा वोल्व्हहार्टने कर्णधार दीप्ती शर्माच्या साथीत चौथ्या गड्यासाठी 71 धावांची अखंडित भागीदारी केली व संघाचा विजय साकार केला.
लॉरा 35 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार फटकावत 51 धावांवर नाबाद राहिली. दीप्तीने नाबाद 24 धावांच्या खेळीत 25 चेंडूत 2 चौकार फटकावले. सुपरनोव्हाजकडून डेंड्रा डॉटीनने 2 गडी बाद केले.
Supernovas’ Captain @ImHarmanpreet scored a brilliant 71 and bagged the Player of the Match award. 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/ey7pHvLcGi#My11CircleWT20C #SNOvVEL pic.twitter.com/rOaEPc8S55
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
संक्षिप्त धावफलक –
सुपरनोव्हाज – 20 षटकांत 5 बाद 150 धावा. (हरमनप्रीत कौर 71, तानिया भाटीया 36, सुन लुस नाबाद 20, केट क्रॉस 2-24). वेलॉसिटी – 18.2 षटकांत 3 बाद 151 धावा. (यस्तिका भाटीया 17, शफाली वर्मा 51, लॉरा वोल्व्हहार्ट नाबाद 51, दीप्ती शर्मा नाबाद 24, डेंड्रा डॉटीन 2-21).