शारजा – सलमा खातून आणि दिप्ती शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ट्रेलब्लेझर्सने महिलांच्या चॅलेंज मिनी आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुपरनोव्हाजचा 16 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या पराभवामुळे सलग तीन विजेेतेपद मिळविण्याचे सुपरनोव्हाजचे स्वप्न धुळीला मिळाले.
विजयासाठी 119 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सुपरनोव्हाजचा डाव 20 षटकात 7 बाद 102 असा रोखला गेला. तत्पूर्वी, अंतिम सामन्यात ट्रेलब्लेझर्स संघाला 118 धावाच करता आल्या. त्यातही प्रमुख फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार स्मृती मानधनाने केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे त्यांना 20 षटकांत 8 बाद 118 धावांपर्यंत मजल मारता आली.
सुपरनोव्हाजची अव्वल गोलंदाज राधा यादवने पाच गडी बाद करत आपले वर्चस्व सिद्ध केले.
नाणेफेक जिंकत सुपरनोव्हाजची कर्णधार हरमनप्रीतने ट्रेलब्लेझर्सला प्रथम फलंदाजी दिली. तिचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. ट्रेलब्लेझर्सची कर्णधार मानधनाने दीएन्द्रा डॉटिनच्या साथील संघाला 71 धावांची सलामी दिली. तेव्हा ते मोठी धावसंख्या उभारतील, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, डॉटिन बाद झाल्यावर त्यांच्या अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर उभे राहूनही अपयश येत होते.
रिचा घोषने काही काळ किल्ला लढवला. मात्र, तीदेखील आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाली. दरम्यान, मानधनाने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली व संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. तिने दमदार अर्धशतकी खेळी केली, पण तिला अन्य फलंदाजांनी साथ दिली नाही. तिने आपल्या 68 धावांच्या खेळीत 49 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 3 षटकारांची बरसात केली.
दीप्ती शर्मा, सोफिया एक्केलस्टोन, हरलिन देओल यांनी साफ निराशा केली. पहिल्या तीन फलंदाजांव्यतिरिक्त ट्रेलब्लेझर्सच्या सहा फलंदाजांना दोन अंकी धावाही करता आल्या नाहीत. सुपरनोव्हाजकडून राधा यादवने पाच गडी बाद करण्याची किमया केली. पूनम यादव व शशिकला सिरीवर्धने यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ट्रेलब्लेझर्स – 20 षटकांत 8 बाद 118 धावा. (स्मृती मानधना 68, दीएन्द्रा डॉटिन 20, रिचा घोष 10, राधा यादव 5-16, शशिकला सिरीवर्धने 1-22, पूनम यादव 1-23). सुपरनोव्हाज – 20 षटकांत 7 बाद 102 धावा. (हरमनप्रीत कौर 30, शशिकला सिरीवर्धने – 19, सलमा खातून 3-18, दिप्ती शर्मा 2-9).