दोहा: जमेकाची शॅली ऍन फ्रेझर प्राईस, अमेरिकेची ऍलिसन फेलिक्स व चीनची लिऊ हॉंग या सुपरमॉम धावपटूंनी विक्रमी कामगिरी करीत जागतिक मैदानी स्पर्धेत वर्चस्व गाजविले. भारतीय संघास 4 बाय 400 मीटर मिश्र रिले शर्यतीत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
प्राईसने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत चौथ्यांदा सुवर्णपदक पटकाविताना 10.71 सेकंद वेळ नोंदविली. पहिल्या बाळास जन्म देण्यासाठी तिने 2017 च्या जागतिक स्पर्धेत भाग घेतला नव्हता. येथे तिने अप्रतिम कौशल्य दाखविताना पहिल्या 20 मीटर्समध्येच मुसंडी मारली आणि इंग्लंडच्या डायना ऍशेर स्मिथला पराभूत केले. स्मिथने रौप्यपदक मिळविताना 10.83 सेकंद वेळ नोंदविली. आयव्हरी कोस्ट देशाच्या मेरी जोसीतालु हिला ब्रॉंझपदक मिळाले. तिने हे अंतर 10.90 सेकंदात पार केले.
महिलांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत चीनची ऑलिम्पिक विजेती खेळाडू हॉंगने सुवर्णपदक जिंकले. तिने 2017-18 मध्ये गरोदरपणासाठी ऍथलेटिक्समधून तात्पुरती निवृत्ती स्वीकारली होती. 32 वर्षीय खेळाडू हॉंगने हे अंतर एक तास 32 मिनिटे 53 सेकंदात पार केले आणि या स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक मिळविले. तिच्याच सहकारी क्वियांग शेनजेई (1 तास 33 मिनिटे 10 सेकंद) व यांग लिऊजिंग (1 तास 33 मिनिटे 17 सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व ब्रॉंझपदक मिळविले.
महिलांच्या पोलव्हॉल्टमध्ये रशियाच्या अँझेलिका सिदोरोवाने 4.95 मीटरपर्यंत उडी मारली आणि सुवर्णमोहोर मिळविली. अमेरिकेच्या सॅंडी मॉरिसला दुसरे स्थान मिळाले तर ग्रीस देशाची ऑलिम्पिक विजेती खेळाडू कॅटरिना स्टेफानिदीने तिसरा क्रमांक मिळविला.
पुरूषांच्या गटात ख्रिस्तियन टेलरने तिहेरी उडीत सुवर्णपदक मिळविले. त्याने 17.92 मीटरपर्यंत उडी मारली. त्याने आतापर्यंत चार वेळा जागतिक सुवर्णपदक व दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहे. विली क्ले व ह्युजेस झांगो यांना अनुक्रमे रौप्यपदक व ब्रॉंझपदक पटकाविले. उत्तेजक प्रकरणी रशियाच्या ऍथलेटिक्स महासंघावर बंदी असल्यामुळे रशियाचे खेळाडू तटस्थ संघ म्हणून सहभागी झाला आहे. टेलरने सोनेरी यश मिळवूनही त्या देशाचे राष्ट्रगीत वाजविले गेले नाही व त्यांचा ध्वजही फडकाविण्यात आला नाही.
संस्मरणीय सुवर्णपदक-प्राईस
आई झाल्यानंतरही मी जागतिक स्पर्धा जिंकल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. संसार व खेळाचे करिअर या दोन्ही आघाड्यांवर महिला चमक दाखवू शकतात हे मला दाखवायचे होते. पुढील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील सोनेरी यश मला प्रेरणादायीच आहे असे प्राईसने सांगितले.
फेलिक्सकडून विश्वविक्रम
फेलिक्सने मुलीला जन्म देण्यासाठी तेरा महिने ऍथलेटिक्समधून विश्रांती घेतली होती. तिला या स्पर्धेत पुनरागमन करताना 400 मीटर्स वैयक्तिक शर्यतीची पात्रता पूर्ण करण्यात अपयश आले. मात्र तिने हे अपयश 4 बाय 400 मीटर्स मिश्र रिले शर्यतीत सुवर्णपदक मिळवित भरून काढले. तिने या सुवर्णपदकासह या स्पर्धेतील स्वत:चे 12 वे सुवर्णपदक जिंकले आणि उसेन बोल्ट याचा 11 विश्व सुवर्णपद्कांचा विक्रम मोडला. तिने या ड्झनभर पद्कांसह करिअरमध्ये 26 जागतिक पद्कांची कमाई केली आहे. तिच्या कामगिरीच्या जोरावर अमेरिकेने रिले शर्यत 3 मिनिटे 9.34 सेकंदात जिंकली.
विक्रमाचे श्रेय प्राईसलाच- फेलिक्स
अपत्यप्राप्तीनंतरही ऍथलेटिक्स करिअर करता येते हा प्राईसने दिलेला सल्ला मी मानला. गेले अनेक महिने मी तिच्याकडून सतत मार्गदर्शन घेत होते. येथे आल्यावरही तिने दिलेले प्रोत्साहन व काही मौलिक सूचना मला फायदेशीर ठरल्या. जरी मला वैयक्तिक शर्यतीत पदक मिळविता आले नाही तरी तिच्याकडून मिळालेल्या प्रेरणेच्या जोरावर मी रिलेत सोनेरी यश मिळवू शकले.