नवे हवाई दल प्रमुख: सीमेवरील घडामोडींवर लक्ष
नवी दिल्ली : पाकिस्तानलगतच्या सीमेवरील घडामोडींवर भारतीय हवाई दल देखरेख ठेऊन आहे. सरकारकडून आदेश आल्यास बालाकोटसारखा हल्ला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी ग्वाही नवे हवाई दल प्रमुख आर.के.एस.भदौरिया यांनी सोमवारी दिली.
पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर भदौरिया पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा अड्डा उद्धवस्त करण्यासाठी भारतीय हवाई दलाने काही महिन्यांपूर्वी थेट पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून कारवाई केली. तशाच प्रकारचा हल्ला पुन्हा करण्यासाठी सज्जता आहे का, या प्रश्नावर भदौरिया यांनी होकारार्थी उत्तर दिले. आमच्या सेवेची देशाला गरज असेल अशा कुठल्याही स्थितीला हाताळण्यासाठी आम्ही तयार आहोत. सरकारच्या आदेशानुसार कुठलीही मोहीम आम्ही राबवू, असे त्यांनी स्पष्ट केले. हवाई दलाची क्षमता वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे. राफेल विमानांमुळे हवाई दलाचे सामर्थ्य वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.