सुपर वुमन

 #BalnaceForBetter

तब्बल 110 वर्षांचा स्त्री सक्षमीकरणाचा इतिहास मागे सोडत यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन आता 111 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वच सदस्य देशांमध्ये विविध उपक्रम, मोहिमा, जनजागृती शिबिरे आणि करमणुकीच्या कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. वास्तविक स्त्रियांचे सर्वच समाजातील योगदान इतके मोठे आणि अतुलनीय असे आहे, की त्यांच्या सन्मानार्थ वर्षातला एखादा दिवस देणे पुरेसे नाही. स्त्री आणि पुरुष यांच्याशिवाय जगरहाटी चालू शकत नसली, तरी स्त्रियांच्या कर्तबगारीची शिखरे, त्यांनी केलेली वाटचाल आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाही गाठलेले यशाचे नवनवे सोपान पाहिले असता, प्रत्येक जणच अचंबित होताना दिसतो.

यावर्षीची आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना आहे, बॅलन्स-फॉर-बेटर! याचाच अर्थ एका नव्या आणि अधिक परिपूर्ण जगासाठी कुटुंब आणि करिअरची तारेवरची कसरत सहज-सुलभपणे करणारी स्त्री हीच आजच्या बदलत्या काळाची सर्वात मोठी लक्षणीय गोष्ट आहे. घर, संसार, मुला-बाळांचे संगोपन आणि अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या याचा विचार करता, हे सगळे नीटपणाने सांभाळून, प्रसंगी आवश्‍यकतेप्रमाणे घराची आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी स्वीकारलेली नोकरी, अथवा स्वतंत्र व्यवसाय सांभाळणारी स्त्री म्हणजे आता केवळ दुर्गा अथवा अष्टभुजा राहिलेली नसून ती एक समर्थ सहस्रभुजा बनत चालली आहे.

आज बदलत्या काळामध्ये, सारे जग एकविसाव्या शतकात पोहोचून, जवळपास दोन दशकांचा कालावधी ओलांडलेला असताना, तसेच सॅटेलाईट टेलिव्हिजन, मोबाईल क्रांती, समाजमाध्यमे अर्थात सोशल मीडियाचा वाढता वापर आणि डिजिटल युगाचा प्रभाव वाढत असताना, अगदी वीट भट्टीवर काम करत असलेली एखादी असंघटित स्त्री असो अथवा एखाद्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेट कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी असो, या सर्वच स्त्रियांच्या भावना, संवेदना, भावविश्‍व यांची दखल आज संपूर्ण जगालाच घ्यावी लागत आहे. पृथ्वी गोल आहे आणि जग म्हणजे एक खेडे बनले आहे या दोन्ही संकल्पना आज वास्तवात उतरलेल्या आहेत.

अशा शतकांच्या संधीकालाच्या निमित्ताने येत असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त दै. प्रभातने कायमच महिलांमधील सृजनशक्तीला सार्थ सलाम केलेला आहे. म्हणूनच आजच्या ‘सुपर वुमन – विमेन्स डे 2020 स्पेशल’ या पुरवणीमध्ये आपल्याला भेटतील विविध क्षेत्रात कार्यरत असूनही आपले काम करण्याचे क्षेत्र आपल्या कुटुंबाचा-परिवाराचा योग्य तो तोल सांभाळत, समाजाला एक सकारात्मक दिशा देत, आपल्या कार्य-कर्तृत्त्वाचा एक वेगळाच ठसा उमटवणाऱ्या, आपल्याच परिसरातील सुपर वुमन.’ समाजातील अशा सर्वच “सुपर वुमन’ना दै. प्रभात’चा मानाचा मुजरा…

धन्यवाद.
– टीम प्रभात, पुणे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.