वडोदरा : वडोदरा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीने येस बॅंकेवर शुक्रवारी निर्बंध येण्याअगोदर एक दिवस म्हणजे गुरुवारी या बॅंकेतून 265 कोटी रुपये काढून घेतल्याचे समोर आले आहे.
वडोदरा महानगरपालिकेचे वडोदरा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्पेशल पर्पज व्हेईकल आहे. येस बॅंकेची आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेली असल्यामुळे रिझर्व बॅंकेने शुक्रवारी सायंकाळी या बॅंकेवर प्रशासक नेमला आहे.
त्याचबरोबर या बॅंकेच्या ठेवीदारांना केवळ 50 हजार रुपये काढता येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असतानाच वडोदरा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने मात्र चलाखी दाखवून एक दिवस अगोदर आपले 265 कोटी रुपयांची रक्कम काढून घेतली असल्याचे समोर आले आहे.
स्पेशल पर्पज व्हेईकलचे प्रमुख आणि वडोदरा महानगरपालिकेचे उपायुक्त सुधीर पटेल यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी मिशन कार्यक्रमांतर्गत 265 कोटी रुपयाचा निधी येस बॅंकेमध्ये पाठविण्यात आला होता.
मात्र येस बॅंकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे आमच्या ध्यानात आल्यामुळे आम्ही 1 दिवसापूर्वी हा निधी बडोदा बॅंकेच्या खात्यामध्ये वळविला होता.
त्यामुळे कंपनीचा निधी येच बॅंकेमध्ये अडकून पडला नाही.
शुक्रवारी रिझर्व बॅंकेने बॅंकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्यास मुभा दिली आहे. जर हा निधी वळविण्यात 24 तासाचा उशीर झाला असता तर स्पेशल पर्पज व्हेईकलचे पैसे एक महिना तरी अडकून पडले असते.
मात्र स्पेशल पर्पज व्हेईकलच्या अधिकाऱ्यांनी स्मार्टनेस दाखवून हे काम केल्यामुळे अडचण निर्माण झाली नाही.