Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस बंड झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी भाजपासह जात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले आहेत. आता लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्यातच कर्जतच्या शिबिरात अजित पवारांनी बारामतीची जागा आपणच लढवणार असल्याचे सांगितल्यानंतर आता त्यांचा गट कामाला लागला आहे. कारण मंत्रालयाबाहेर लागलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शरद पवार गटाचा पराभव करण्यासाठी अजित पवार गट सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच मंत्रालयाबाहेर सुनेत्रा पवार यांच्या नावाने बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर ‘सुनेत्रा पवार बारामतीच्या भावी खासदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
मंत्रालयाच्या समोर असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे. बारामती हा सुप्रिया सुळेंचा लोकसभा मतदार संघ आहे त्या मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना उभं करण्याचा विचार अजित पवार गटाने निर्धार केला असल्याचे दिसत आहे. या बॅनरनंतर याच चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
अजित पवार गटाने कर्जतमध्ये चिंतन शिबिरात एक भाष्य केले होते. सातारा, शिरुर, रायगड आणि बारातमी या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवार देणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले होते. त्यानंतर दोनच दिवसात हा बॅनर लागला आहे. सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघातून खासदार होतील हा दावा करत भावी खासदार सुनेत्रा पवार अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे.