शिमला – हिमाचल प्रदेशची सत्ता काबीज करणाऱ्या कॉंग्रेसने शनिवारी मुख्यमंत्रिपदासाठी सुखविंदरसिंह सुखू यांचे नाव निश्चित केले. त्याशिवाय, आणखी एक प्रमुख नेते मुकेश अग्निहोत्री यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवार) होईल.
विधानसभा निवडणुकीत बाजी मारून कॉंग्रेसने भाजपला हिमाचलच्या सत्तेवरून हटवले. त्यानंतर शुक्रवारी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदार असल्याने नावाबाबत सहमती होऊ शकली नाही. त्यामुळे त्या बैठकीत मुख्यमंत्री ठरवण्याचे सर्वाधिकार कॉंग्रेस अध्यक्षांना देणारा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांनी जोरदार लॉबिंग आणि शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वासमोर पेच निर्माण झाला. त्यातून मुख्यमंत्री निवड लांबेल, असे चित्र पुढे आले होते.
मात्र, शनिवारी पुन्हा कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून 58 वर्षीय सुखू, तर उपमुख्यमंत्री म्हणून 60 वर्षीय अग्निहोत्री यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याविषयीची घोषणा छत्तिसगढचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक भुपेश बघेल यांनी बैठकीनंतर केली. बैठकीला निरीक्षक म्हणून हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा आणि पक्षाचे प्रभारी राजीव शुक्ला हेही उपस्थित होते.
सुखू यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुखपद सांभाळले. त्यांच्याकडे तब्बल सहा वर्षे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. चार वेळा आमदार बनलेल्या सुखू यांच्याकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून पाहिले जाते.