सिमला – हिमाचलप्रदेशात सुखविंदरसिंह सुक्खु यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले आहे. आज राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुखु यांच्यासह उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांना अधिकारपदाची शपथ दिली. या शपथविधी समारंभाला कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, राहुल गांधी, कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत इत्यादी उपस्थित होते. बऱ्याच प्रतिक्षेनंतर कॉंग्रेस पक्ष भाजपला हरवून एखाद्या राज्यात सत्तेवर आला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा हुरूप वाढला आहे.
शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री म्हणाले की आम्ही निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार पहिल्याच कॅबिनेट मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची जुनी पेन्शन योजना बहाल करणार आहोत. ते म्हणाले की, कोणत्याही राज्यात कॉंग्रेस सत्तेवर येणार नाही असे लोक म्हणत होते पण आम्ही हिमाचलात भाजपला हरवून सत्तेवर आलो आहोत. भाजपचा रथ आम्ही हिमाचलात रोखला आहे.
सिमल्यात झालेल्या कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सुखविंदरसिंह यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. हिमाचलात अनेक जण मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते. त्यामुळे येथे शेवटच्या क्षणापर्यंत मोठी रस्सीखेच होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सर्वच इच्छुकांनी सुखविंदरसिंह यांच्या निवडीला पाठींबा दिल्याने हा पेच संपुष्ठात आला.
गुजरात मध्ये भाजपच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्या आधी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्याने कॉंग्रेसने या बाबतीतही बाजी मारल्याचे सांगितले जात आहे. गुजरात मध्ये बिनबोभाट मुख्यमंत्रीपदाची निवड झाली पण कॉंग्रेसचे घोळ सुरूच राहिला होता. त्यामुळे जे चित्र निर्माण झाले होते तर यामुळे दूर झाले.
शपथविधीला प्रतिभा सिंहही होत्या उपस्थित
हिमाचल प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्रसिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह याही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होत्या. त्यासाठी त्यांनी मोठे लॉबिंग चालवले होते असे सांगितले जात होते. परंतु त्यांना डावलले गेल्याने त्या या शपथविधी समारंभाला उपस्थित राहतील की नाही या विषयी विविध अटकळी लावल्या जात होत्या. परंतु त्या या समारंभाला उपस्थित होत्या.
तत्पुर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते की मी या समारंभाला जाणे टाळण्याचे काहीच कारण नाही. ती पक्षाशी प्रतारणा ठरेल. मी तसे काहीही करणार नाही असे प्रतिभा सिंह यांनी स्पष्ट केले. शपथविधीनंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री व अन्य उपस्थितीतांनी दिवंगत वीरभद्रसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून त्यांना अभिवादनही केले.