Himachal Pradesh Congress । हिमाचलमधील काँग्रेसच्या 6 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. काँग्रेसच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी आज हा निर्णय दिला. ज्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, यामध्ये धर्मशालाचे आमदार सुधीर शर्मा, सुजानपूरचे आमदार राजेंद्र राणा, कुतलाहारचे आमदार देवेंद्र भुट्टो, गाग्रेटचे आमदार चैतन्य शर्मा, लाहौल स्पितीचे आमदार रवी ठाकूर आणि बडसरचे आमदार इंद्र दत्त लखनपाल यांचा समावेश आहे.
पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत हा निर्णय देत सर्वांना अपात्र ठरवले आहे.
विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप पठानिया म्हणाले, ‘अर्थसंकल्प मंजूर करताना हे आमदार विधानसभेत उपस्थित नव्हते. मी या आमदारांना अपात्र ठरवले असून पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्यामुळे पक्षांतरविरोधी कायद्याची तरतूद त्यांना लागू होते. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहे.
असेही स्पीकर म्हणाले.या आमदारांनी मंगळवारी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांना मतदान केले. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हे बंडखोर आमदार सध्या हरियाणातील पंचकुला येथील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामी आहे. दरम्यान, काँग्रेसनेही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हे सहाही नेते बुधवारी शिमल्याला गेले होते, मात्र हे सर्वजण भाजप नेत्यांसोबत दिसले. यावेळी अर्थसंकल्पावर मतदान झाले.
व्हीपचे उल्लंघन केल्याचा आरोप
हे सर्व आमदार अर्थसंकल्पावेळी गैरहजर होते. यासाठी काँग्रेसने आमदारांना व्हीप जारी केला होता. या उल्लंघनाबाबत काँग्रेसने सभापतींसमोर याचिका दाखल केली. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. आता सभापतींनी निकाल दिला आहे. खरे तर राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे सुखविंदर सिंग सखू सरकार अडचणीत आले होते. सहा आमदारांसह तीन अपक्षांनीही काँग्रेसचा ताण वाढवला. दरम्यान, विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली.
संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने डीके शिवकुमार आणि भूपेंद्र सिंग हुडा यांना शिमल्यात पाठवले. विक्रमादित्य सिंह आणि इतर आमदारांशी चर्चा झाली. बैठकीनंतर विक्रमादित्य सिंह यांनी नम्रता दाखवत राजीनामा मागे घेण्याची घोषणा केली. हिमाचलमधील 68 जागांपैकी काँग्रेसकडे 40 तर भाजपकडे 25 आमदार आहेत. तीन अपक्ष आमदार आहेत. काँग्रेसच्या 40 पैकी सहा आमदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
हेही वाचा
Elon Musk | एलॉन मस्कची यूजर्ससाठी भन्नाट ऑफर; आता एक्सवर ‘हे’ फीचर मिळणार मोफत