आगामी हंगामात कारखान्यांपुढे उसाचे संकट; चारा टंचाईमुळे उसाची मागणी वाढली

नगर: पाण्याअभावी उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली. त्याबरोबर आहे तो ऊस काही भागात पाण्यामुळे जळाला तर चारा टंचाईमुळे दुसरीकडे उसाची मागणी वाढली आहे. त्याचा फटका आगामी गळीत हंगामाला बसण्याची शक्‍यता असून कारखान्यांपुढे उसाचे संकट निर्माण होणार आहे. या हंगामात निम्म्यापेक्षा कमी ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. परिणामी उसाची पळवापळवीला जोर येणार असून शेजारच्या जिल्ह्यातून ऊस मोठ्या प्रमाणावर गाळपासाठी आणला जाईल.

यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांना मुबलक ऊस उपलब्ध झाल्याने अतिरिक्त साखर उत्पादन झाले. उत्पादित साखर ठेवण्यासाठी कारखान्यांसमोर जागेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. परंतु आता पुढील पाच महिन्यानंतर सुरू होणाऱ्या गळीत हंगामात उसाचा प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा 23 साखर कारखान्यांना ऊस उपलब्ध झाला होता. त्यामुळे तब्बल 1 कोटी 60 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळप चांगल्या पद्धतीने होवून साखरचे उत्पादन मोठे झाले असून अद्यापही कारखान्यांकडील साखरेची विक्री झाली नाही. त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना एफआरपीनुसार भाव मिळालेला नाही. असून 400 कोटीपर्यंत शेतकऱ्यांची देयके रखडली आहे.

यंदाचा हंगाम संपल्यानंतर आगामी हंगामासाठी साखर उपसंचालक कार्यालयाचे नियोजन सुरू झाले आहे. कारखानानिहाय उपलब्ध उसाबाबत चर्चा झाली आहे. साखर प्रादेशिक सहसंचालक, कृषी विभाग, साखर कारखान्यांचे व्यवस्थापन यांच्या बैठकीत नगर जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात 70 हजार 911 हेक्‍टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र निम्मे आहे. गेल्या हंगामात 1 लाख 34 हजार हेक्‍टरवर ऊस होता. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामा यशस्वीपणे पार पडला. परंतु पुढचा हंगामात उसाचे क्षेत्र कमी झाल्याने हंगाम कसाबसा पार पडण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात पाण्याबरोबरच चारा टंचाई दिवसेंदिवस वाढू लागल्याने आहे तो ऊस जळू लागला आहे. त्याबरोबर उसाशिवाय अन्य चारा उपलब्ध नसल्याने उसाची मागणी वाढली. जिल्ह्यात सध्या 503 चारा छावण्या जनावरांसाठी उभारण्यात आल्या आहेत. त्या छावण्यांमध्ये चारा म्हणून जनावरांना ऊस देण्यात येत आहे. या छावण्यांमध्ये तीन लाखांहून अधिकारी लहान-मोठे जनावरे आहेत. या छावण्याबरोबरच ज्यांची जनावरे घरी आहेत. ते शेतकरी देखील सध्या ऊस चारा म्हणून जनावरांना देत आहे. परिणामी आहे त्या उसाच्या क्षेत्रातून ऊस चारा म्हणून मोठ्या प्रमाणावर जात आहे. चारा टंचाईमुळे उसाला टनाला तीन ते साडेतीन हजार रुपये दर मिळत आहे. त्यामुळे बागायती भागातील ऊस तोडून तो विक्रीसाठी आणला जात आहे. पाऊस सुरू होईपर्यंत चारा छावण्या सुरू राहणार आहे. त्यासाठी महिन्याभराचा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत हजारो हेक्‍टरवरील उसाचा चारा म्हणून वापर होणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांसमोर यंदा उसाचे संकट आहे. त्यामुळे उस उपलब्ध नसलेले कारखाने अडचणीत येणार आहेत. नेवासा, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत, राहुरी, संगमनेर या तालुक्‍यातील उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्याचा परिणाम ऊस तोडणी मजुरांवर होणार आहे.

उसाचे क्षेत्र कमी झाल्यानंतर कारखान्यांमध्ये कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यातून पळवापळवीला जोर येणार असून शेजारच्या जिल्ह्यातून देखील ऊस आणला जावू शकतो. तसेच जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांकडून शेजारच्या तालुक्‍यातून ऊस पळविणार जाण्याची शक्‍यता आहे.


गाळपासाठी उपलब्ध उसाचे क्षेत्र हेक्‍टरमध्ये

अगस्ती 4 हजार 161, अशोक 3 हजार 932, डॉ बा. बा. तनपुरे 3 हजार 621, ज्ञानेश्‍वर 8 हजार 732, गणेश 683, केदारेश्‍वर 2 हजार 517, काळे 1 हजार 724, कुकडी 3 हजार, मुळा 6 हजार 20, थोरात 3 हजार 451, संजीवनी 2 हजार 61, नागवडे 3 हजार 990, वृध्देश्‍वर 3 हजार 907, क्रांती-1 हजार 964, गंगामाई 2 हजार 566, अंबालिका-3 हजार 477, युटेक शुगर-3 हजार 296. यात मुळा कारखान्याच्या कार्यंक्षेत्रात उसाचे क्षेत्र जास्त आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×