सातारा -करोना संक्रमणामुळे सर्वसामान्य सातारकरांच्या चिंता वाढल्या आहेत. कोविड रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी सातारा रनर्स फाउंडेशनच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाला साडेसात लाख रुपये किमतीची “मल्टिपॅरा सेंट्रल मॉनिटरिंग’ यंत्रणा भेट म्हणून दिली. या अद्ययावत सुविधेमुळे बाधितांच्या उपचारांमध्ये सुसूत्रता आणणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह व प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या उपस्थितीत या यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले.
रुग्णांची वाढती संख्या आणि साधने, सुविधांच्या मर्यादांमुळे उपचार करताना अनेक अडचणी येत आहेत. हे ओळखून साताऱ्यातील रनर्स फाउंडेशनचे डॉ. संदीप काटे व सहकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाला सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीमची भेट दिली. यासाठी साडेसात लाख रुपये खर्च आला आहे. या यंत्रणेत तब्बल चौदा मल्टिपॅरा मॉनिटर असून ही यंत्रणा पंधरा बेडच्या नवीन अतिदक्षता विभागात बसविण्यात आले आहे. या यंत्रणेच्या लोकार्पणप्रसंगी सातारा हिल मॅरेथॉन समितीचे अध्यक्ष डॉ. सुचित्रा काटे, शर्यत संचालक डॉ. पल्लवी पिसाळ, उपाध्यक्ष डॉ. रंजिता गोळे, सचिव डॉ. आदिती घोरपडे, डॉ. प्रतापराव गोळे उपस्थित होते.
करोना वॉर्डमध्ये डॉकटरांना प्रत्येक वेळी प्रत्येक रुग्णाच्या शारीरिक स्थितीच्या नोंदी मॉनिटरवर पाहणे शक्य होत नाही. यात डॉकटरांना संक्रमणाचा धोका संभवतो; परंतु या नवीन यंत्रणेमुळे सर्व रुग्णांच्या शारीरिक नोंदी एकाच मॉनिटरवर पाहणे शक्य होणार असून सोशल डिस्टन्सिंग पाळणेही शक्य होणार आहे. याबद्दल डॉ. सुभाष चव्हाण यांनी रनर्स फाऊंडेशनचे आभार मानले.
याशिवाय करोनाच्या काळात नागरिकांच्या तंदुरुस्तीसाठी रनर्स फाउंडेशनने माची पेठ व पोलीस कवायत मैदानावर साडेसहा लाख रुपये खर्च करून ओपन जिम उभारली आहे. या जिमचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे. जगातील पहिल्या “स्टे होम’ मॅरेथॉनचे आयोजन रनर्स फाऊंडेशनने केले होते. सहभागी स्पर्धकांना ऑनलाइन प्रशस्तीपत्रे व “फिनिशर मेडल्स’ घरपोच देण्यात आले. जगात पहिल्यांदाच झालेली ही स्पर्धा पूर्णपणे मोफत होती. भारतासह अमेरिका, सिंगापूर, पेरू, बांगलादेश येथील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यासाठी फौंडेशनने तीन लाख रुपये खर्च केले. प्रवासी व विद्यार्थ्यांनाही वेळोवेळी धान्यवाटप करून फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपली आहे.