नागठाणे -कमी दरात खडी व ग्रीट टाकत असल्याच्या गैरसमजुतीतून फत्यापूर (ता. सातारा) येथील दिगंबर लक्ष्मण घाडगे या व्यावसायिकावर तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी आकाश शशिकांत घाडगे (रा. फत्यापूर) याच्यासह चौघांवर बोरगाव पोलीस ठाण्यात काल (दि. 28) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दिगंबर घाडगे व त्याचा मित्र राहुल राजाराम घोलप हे मिळून खडी व ग्रीटचा व्यवसाय करतात. आकाश घाडगे हादेखील तोच व्यवसाय करतो. दिगंबर व त्याचा मित्र कमी दरात खडी व ग्रीट विकत असल्याचा आकाश घाडगेचा गैरसमज झाला होता. त्यातूनच गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि. 25) त्यांच्यात वादावादी झाली होती.
त्यानंतर माफी मागायची आहे, असे फोनवरून बोलून आकाशने दिगंबर व राहुल घोलप यांना शनिवारी (दि. 26) सायंकाळी गावातील चौकात बोलावून घेतले. ते दोघे चौकात आल्यावर तेथे एक चारचाकी गाडी उभी असून त्यात आकाश व अन्य तीन जण असल्याचे दिसले. हे दोघेही आकाशला भेटायला गेले असता, आकाशने गाडीतून तलवार काढून त्यांना शिवीगाळ केली. तलवार पाहून दोघे पळाले; परंतु आकाश व त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून दोघांना अडवले. आकाशने दिगंबरच्या हातावर व डोक्यात तलवारीने वार केले तर बाकीच्या तिघांनी लाकडी दांडक्याने दिगंबरला बेदम मारहाण केली.
यामध्ये गंभीर जखमी होऊन दिगंबर हा बेशुद्ध पडला होता. गावातील लोकांनी त्याला उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून सोमवारी घरी सोडल्यानंतर दिगंबरने रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल तपास करत आहेत.