मॉस्को – सरमत या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची रशियाने यशस्वी चाचणी घेतली आहे. युक्रेनच्या मुद्यावरून रशिया आणि पाश्चात्य देशांमधील तणाव चांगलाच वाढलेला असताना रशियाने या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
रशियाच्या प्रमाण वेळेनुसार दुपासी सव्वा 3 वाजण्याच्या सुमारास रशियाच्या वायव्येकडील अर्खानगेत्स भागातील प्लेसेत्स चाचणी केंद्रावरून येथून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. कामचालका द्विपसमुहातील कुरा टेस्ट ग्राऊंडवरील नियोजित लक्ष्य या क्षेपणास्त्राने अचूक भेदले, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या क्षेपणास्त्रामुळे आधुनिक क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेला भेदता येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सरमत क्षेपणास्त्रामुळे रशियाच्या सशस्त्र दलांची मारक क्षमता अधिकच वाढली आहे. या क्षेपणास्त्रामुळे कोणत्याही बाह्य आक्रमणांपासून रशियाचे संरक्षण केले जाऊ शकेल. आता रशियाला धाक दाखवू इच्छिणाऱ्यांनी दोनदा विचार करावा, असेही पुतीन यांनी म्हटले आहे.