नगर – करोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील तीन ठिकाणी आज लसीकरणाची सरावफेरी अर्थात ड्राय रन घेण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार्या आरोग्य कर्मचार्यांना लस कशा प्रकारे देण्यात येणार, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नगर महापालिकेच्या तोफखाना भागातील आरोग्य केंद्रात भेट देऊन देखील व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा लसीकरणाची सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी माध्यमांना दिली.
राज्य शासन आणि आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्ह्यात महापालिका आणि ग्रामीण भागात या लसीकरण मोहिमेचे प्रात्यक्षिक झाले. निवड केलेले लाभार्थी, त्यांची नोंद, त्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया, त्याचे कोविन अॅपवर नोंदणी, लसीकरण झाल्यानंतर लाभार्थ्यांला पहिले लसीकरण झाल्याबाबत त्याच्या मोबाइलवर आलेला संदेश ही सर्व प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्वत: पाहिली. तेथील नियोजनाबाबत काही सूचनाही दिल्या. संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात वाळकी (ता. नगर) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेेंद्र क्षीरसागर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे तसेच जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी भेट दिली. तेथील लसीकरण मोहिम सरावफेरी संदर्भात केलेली तयारी आणि प्रत्यक्ष सरावफेरीची त्यांनी पाहणी केली.
नगरमध्ये महापालिकेचे वैद्यकीय आोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना लसीकरण मोहीमेची माहिती दिली. कार्यक्रम अधिकारी डॉ. नलिनी थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका गोरे, डॉ. सुजीत सैंदाणे, मंगला माटे, प्रतिमा राऊत, पूनम सूर्यवंशी, निर्मला गायकवाड, अलका कोलवते, अन्सारी ईबारतुनिसा, राहील प्रभुणेस, इम्रान सय्यद, अमोल गुजर, सोनाली कर्पे, योगेश गडाख, विकास गीते, द्वारका साठे आदींनी या लसीकरण मोहिमेसंदर्भातील सरावफेरीदरम्यान विविध कामांचे संयोजन केले.
वाळकी ग्रामीण आरोग्य केंद्रात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सरावफेरीची तयारी आणि प्रात्यक्षिक करण्यात आले. डॉ. अनिल ससाणे आणि त्यांच्या सहकार्यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यामध्ये डॉ. नंदा वाघ, डॉ. मनीष बडे, डॉ. सुवर्णा कांबळे, डॉ. व्ही. पी. शेजाळ, डॉ. रुपाली काळे, शेख नसरीन यांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्य विभागाने दिलेले निर्देश आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करत हा ड्राय रन पार पडला.
अशी पार पडली लसीकरणाची सरावफेरी!
या लसीकरण सरावफेरीसाठी प्रत्येक केंद्रावर 25 लाभार्थी आरोग्य कर्मचार्यांची निवड करण्यात आली होती. लसीकरणासाठी निवडण्यात आलेले कर्मचारी आरोग्य केंद्रात आल्यानंतर त्यांची ओळख पटवणे, त्यांच्या शरीराचे तापमान मोजणे आणि ऑक्सीजनचे प्रमाण तपासणे, आदी कामे करण्यात आली. त्यानंतर त्यांची नोंद केली जात होती.
त्यानंतर त्यांना प्रतीक्षा कक्षात बसवले जात होते. तेथून त्यांना लसीकरणासाठी असलेल्या कक्षात नेले जात होते. तेथे कोविड अॅपवर त्यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्यांना लसीकरण दिले जात होते. त्यांना काही त्रास होत नाही ना याची विचारपूस केली जात होती. याचदरम्यान, संबंधितांना लसीकरण झाल्यानंतर त्यांच्या मोबाइलवर लसीकरणाचा पहिला डोस झाल्याचा संदेश प्राप्त होत होता.