जामखेड तालुक्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू

जामखेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोडेगाव, पाटोदा व खर्डा येथील तीन जणांचा वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, जामखेड शहरातील कर्जत रोडवरील एका विहीरीत मयत अमोल विश्वनाथ मोरे (वय २५, रा. पाटोदा ता. जामखेड) या तरुणाचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगतांना दि ८ रोजी नागरिकांना आढळून आला मृतदेहाची अवस्था पाहून काही दिवसांपासून विहिरीत पडून असल्याचे समजते. 

दुसर्‍या घटनेत तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी मयत दत्तात्रय दगडु आडसूळ (वय ५० वर्षे रा. घोडेगाव) याचा देखील मृतदेह विहिरीत पडुन पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदरची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. या बाबत अशोक दत्तात्रय आडसूळ यांनी जामखेड पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. 

तर तिसऱ्या घटनेत तालुक्यातील खर्डा या ठिकाणी याच दिवशी सचिन हरीशचंद्र डुकरे (वय २३ वर्षे) याने खर्डा येथील आपल्या रहात्या घरी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोरी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी रतिलाल रोहीदास डोके यांनी जामखेड पोलीस खबर दिली आहे. 

एकाच दिवशी तिघांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला आसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तीनही जणांवर जामखेड ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यात आले असुन जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.