Success Story : जर तुमचा स्वतःवर आत्मविश्वास आणि काहीतरी करण्याची जिद्द असेल तर तुम्ही मोठे यश मिळवू शकता. असं म्हणतात की नशीब सुद्धा धैर्यवानांवर आपली कृपा दाखवते. असंच काही दिल्लीतल्या एका तरुणासोबत घडले. ज्याने कोवळ्या वयात महाविद्यालयीन शिक्षण सोडून काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या याच इच्छेने आज त्याला कोट्यवधींचा मालक बनवले आहे. काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या रस्त्यावर सिमकार्ड विकणाऱ्या या मुलाचा आता जगातील सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे. हॉस्पिटॅलिटी चेन OYO Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल असे या तरुणाचे नाव आहे. आजच्या Success Story च्या भागात रितेश अग्रवाल यांच्या जिद्दीची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…
मारवाडी कुटुंबात जन्म
रितेश अग्रवालचा जन्म 16 नोव्हेंबर 1993 रोजी ओरिसातील कटक येथील बिसम येथे एका सामान्य मारवाडी कुटुंबात झाला. आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे, अशी रितेशच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण आई-वडिलांच्या स्वप्नांच्या विरुद्ध दिशेने रितेशचा प्रवास सुरु करण्याचा विचार होता. रितेश उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहत होता. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण राहत्या गावीच पूर्ण केला. त्याच्यानंतर पुढील शिक्षणासाठी रितेश दिल्लीला गेले.
रितेशने दिल्लीतील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला, पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू होते आणि त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडले. पुढे घरच्यांनी आयआयटी प्रवेशाच्या तयारीसाठी कोटाला पाठवले, पण रितेशला तिथे जावेसे वाटले नाही.
सिम कार्ड रस्त्यावर विकले जातात
रितेशने 2012 मध्ये ओरवेल स्टेज नावाचा स्टार्टअप सुरू केला. पण यात त्यांना यश आले नाही यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा दिल्लीची वाट धरली. त्यावेळी त्यांच्याकडे पैसेही शिल्लक नव्हते. खिशात फक्त 30 रुपये शिल्लक होते. उद्योजक बनण्याचे भूत काही केल्या डोक्यातून जात नव्हते. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. काहीच हाती न लागल्याने तो रस्त्यावर फिरून ते सिमकार्डची विक्री करू लागले.
ओयोची (OYO Rooms) अशी झाली सुरुवात
रितेशला सुरुवातीपासूनच प्रवासाची खूप आवड होती. अभ्यासातून वेळ मिळाला की ते बाहेर फिरायला जायचे. 2009 मध्ये रितेश डेहराडून आणि मसुरीला गेले होते. तिथल्या सौंदर्याने रितेश मंत्रमुग्ध झाले. इथे पोहोचल्यानंतर रितेशला समजले की देशात अनेक सुंदर ठिकाणे आहेत ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. अशा ठिकाणांबद्दल लोकांना सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटले. यानंतर रितेशने ऑनलाइन सोशल कम्युनिटी तयार करण्याचा विचार केला. जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर लोकांना परवडणाऱ्या किमतीत सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जाऊ शकतात. जेणेकरून लोकांना ते सोपे होईल आणि ते नवीन ठिकाणांना भेट देऊ शकतील. इथूनच रितेशला त्यांच्या भविष्यातील व्यवसायाच्या आशेचा किरण सापडला .
रितेशने आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी अनेक वर्ष संशोधन केले. त्यातून सुरुवातीला त्यांनी एक कंपनी स्थापन केली ज्याचे नाव OREVAL Stays असे ठेवण्यात आले. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने त्यांनी स्वस्त दरात हॉटेल बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर 2013 मध्ये, रितेशची थील फेलोशिपसाठी निवड झाली, ज्यातून त्याला सुमारे 75 लाख रुपये मिळणार होते. या पैशातून त्यांनी ओयो रूम्स सुरू केल्या. हळूहळू आपल्या व्यायसायाची व्याप्ती रितेश यांनी वाढवली आणि आज ते कोट्यवधींचे मालक बनले.
कोट्यवधींची संपत्ती
रितेशने आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने जे केले ते आज सर्वांसमोर आहे. आज रितेशचा जगातील 80 देशांतील 800 शहरांमध्ये हॉटेल व्यवसाय आहे. एवढ्या कमी वयात रितेश आज 8000 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक बनला आहे. रितेश अग्रवालच्या संपत्तीबद्दल बोलायचे तर त्यांची एकूण संपत्ती 1.1 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 7253 कोटी रुपये आहे. झपाट्याने वाढणाऱ्या व्यवसायात ओयेची गणना केली जात आहे. देशाव्यतिरिक्त परदेशातही त्यांची संपत्ती पसरली आहे.