Success Story : जर माणसाच्या अंगात काही करण्याची जिद्द असेल तर त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून इच्छित ध्येय साध्य करता येऊ शकते. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुजरातच्या त्या सात महिला आहेत ज्यांनी आपल्या व्यवसायाची मेढ केवळ ८० रुपयात रोवली आणि बघता बघता त्या व्यवसायाने कोट्यवधींची उलाढाल करण्यास सुरुवात केली.
९० च्या दशकात लोकांच्या घरात ज्यावेळी केवळ ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन असायचे. त्यावेळच्या लोकप्रिय जाहिरातींमध्ये एक अशी जाहिरात होती जी प्रत्येकाच्या ओठावर होती आणि ती जाहिरात होती लिज्जत पापडची. (Lijjat Papad ) लिज्जत पापडची चव अशी काही लोकांच्या घराघरात पोहचली कि त्याचे नाव आजही लोकांच्या मुखात आहे. बघता बघता लिज्जत पापड (Lijjat Papad ) ब्रँड बनला.
लिज्जत म्हणजे गुजरातीमध्ये चव. लिज्जत पापडची गोष्ट देखील खूपच रंजक आहे. सात महिलांनी मिळून लिज्जत पापड (Lijjat Papad ) हा एवढा मोठा ब्रँड कसा बनवला हे आजच्या Success Story च्या भागतीतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत….
अशी सुरुवात झाली (Success Story – Lijjat Papad)
मुंबईत राहणाऱ्या जसवंती जमनादास यांनी १९५९ मध्ये त्यांच्या ६ मैत्रिणींसोबत पहिल्यांदा लिज्जत पापड सुरू केले. हा तो काळ होता जेव्हा महिलांना व्यवसाय किंवा नोकरीसाठी फारसे स्वातंत्र्य मिळाले नव्हते, पण जसवंती जमनादास यांनी धाडस केले आणि लिज्जत पापडचा पाया रचला. हा व्यवसाय सुरू करण्यामागचे पैसे कमावणे हे एकमेव उद्दिष्ट नव्हते, तर या सात महिलांना यातून आपल्या कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावायचा होता.
जसवंती जमनादास पोपट यांच्यासह पार्वतीबेन रामदास थोडानी, उजमबेन नारनदास कुंडलिया, बानुबेन तन्ना, लगबेन अमृतलाल गोकाणी, जयाबेन विठलानी यांनी पापड बनवण्याचे काम सुरू करायचे ठरवले. त्यांच्यासोबत आणखी एक महिला होती ज्यांच्यावर पापड विकण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
सुरुवातीला पापडाची 4 पाकिटांची निर्मिती केली (Success Story – Lijjat Papad)
या महिलांनी सुरुवातीला पापडांची 4 पाकिटे बनवून एका बड्या व्यावसायिकाला विकली. यानंतर व्यावसायिकाने आणखी पापड मागितले. त्यानंतर या महिलांच्या मेहनतीला फळ आले आणि त्यांची विक्री दिवसरात्र वाढत राहिली. छगनलाल या व्यावसायिकाने या सर्व महिलांना ब्रँडेड पापड बनवण्याची कल्पना दिली, त्यात त्यांनी पापडाच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारे तडजोड न करण्याचा सल्ला दिला. या महिलांना खाते हाताळणे, मार्केटिंग इत्यादींचे प्रशिक्षण देण्यातही त्यांनी मदत केली. सात महिलांचा हा गट कोऑपरेटीव्ह सिस्टम बनला. यामध्ये १८ वर्षांवरील गरजू महिलांचा समावेश करण्यात आला होता.
उलाढाल कोट्यवधींची आहे (Success Story – Lijjat Papad)
लिज्जत पापड व्यवसायातून महिलांनी त्यावेळी वर्षभरात 6196 रुपये कमावले होते. हळूहळू य व्यवसायाने आपली पाळेमुळे मजबूत केली. अनेकांना यात सहभागी करून घेण्यात आले. आज कंपनीची उलाढाल 1600 कोटींहून अधिक आहे.
लिज्जत पापडच्या १७ राज्यांत ८२ शाखा, 25 देशांमध्ये निर्यात (Success Story – Lijjat Papad)
आज लिज्जत पापडच्या १७ राज्यांत ८२ शाखा आहेत. हा पापड भारतातच नाही तर इतर देशांमध्येही विकला जातो. लिज्जत पापड यूके, हॉलंड, फ्रान्स, बहरीन, चीन, हाँगकाँग, थायलंड, मलेशिया अशा एकूण 25 देशांमध्ये निर्यात केले जाते.
दरम्यान, महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करण्यासाठी लिज्जत पापडची स्थापना करणाऱ्या जसवंती जमनादास यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. लिज्जत पापड या सहकार चळवळीत आज ४५ हजारांहून अधिक महिला काम करत आहेत, त्या संपूर्ण व्यवसाय चालवत आहेत. या महिलांना लिज्जत सिस्टर्स म्हणतात.