प्रेरणा : यू ट्यूबवरील शेतकऱ्यांची यशोगाथा

-दत्तात्रय आंबुलकर

विज्ञान-तंत्रज्ञान व संगणक प्रणालीचा उचित उपयोग करून विभिन्न विषयांवरील यू-ट्यूबच्या चित्रफिती आता सर्वदूर प्रसारित होत आहेत. मात्र, याच यू-ट्यूब तंत्रज्ञानाचा उपयोग आपली शेती आणि संबंधित कामासाठी यशस्वीपणे करून या यशोगाथा लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आगळावेगळा प्रयोग काही युवा शेतकऱ्यांनी केला असून त्यांच्या या उपक्रमाला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

अंबाला जिल्ह्यातील शेतकरी हरविलास सिंह यांच्याबरोबर त्यांच्या यू-ट्यूब चित्रफितीत त्यांची धष्टपुष्ट म्हैसही दिसते. या चित्रफितीचे वैशिष्ट्य म्हणजे इतर स्थानिक म्हशींपेक्षा हरविलास सिंहाची म्हैस तुलनेने अधिक दूध देते व त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या म्हशीसाठी ठराविक कालावधीनंतर व तिच्या गरजेनुरूप पाणी देण्याची व्यवस्था मोठ्या कल्पकपणे केली असून त्याचाच हा परिणाम आहे. हरविलास सिंहच्या या प्रयोगशीलतेवर आधारित व म्हशीला अधिक दुधाळू बनविण्याच्या यशस्वी प्रयोगावर आधारित अशा त्यांच्या यू-ट्यूब-चित्रफितीला सुमारे 50 लाख दर्शक देश-विदेशांतून लाभले आहेत.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील संतोष जाधव या तरुण शेतकऱ्याने यशस्वीपणे अंमलात आणलेल्या पावसाळी पाण्याद्वारे भाजीपाल्याचे उत्पादन वाढीसाठी केलेल्या प्रयोगावर आधारित यू-ट्यूब चित्रफितीला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संतोष जाधवच्या या यशस्वी प्रयोगाला 5 लाखांवर लोकांनी यू-ट्यूबद्वारा भेट तर दिलीच शिवाय 200 वर शेतकऱ्यांकडून संतोष जाधवला त्यांच्या प्रयोगाबद्दल विचारणा करण्यात आली ही बाब यासंदर्भात महत्त्वपूर्ण ठरली आहे.

यातूनच बदलत्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पार्श्‍वभूमीवर युवा व संगणकीय पद्धतींशी परिचित अशा युवा तंत्रज्ञ-शेतकऱ्यांनी आपापल्या प्रयत्न आणि यशोगाथांना “कृषी दर्शन’ असे साजेसे नाव दिलेले आहे. या यू-ट्यूब चित्रफितींमध्ये प्रत्यक्षात साकारलेल्या व वस्तुस्थितीनिष्ठ माहितीचे सजीव चित्रीकरण व सादरीकरण केल्यामुळे त्याची परिणामकारकता साधली आहे. याच प्रयोगशील टप्प्याचा एक भाग म्हणून संतोष जाधव या 26 वर्षीय यशस्वी शेतकऱ्याने शेतकऱ्यांना शेती आणि कृषीविषयक माहिती देण्यासाठी गेल्यावर्षी “इंडियन फार्मर’ नावाने यू-ट्यूबच्या शृंखलांवर आधारित माहिती व प्रबोधनपर ग्रामीण चॅनेलच सुरू केले.

या प्रयोगातील तांत्रिक टप्प्यांची माहिती देताना संतोष जाधव नमूद करतात की, त्यांनी आपल्या पहिल्या कृषी चित्रफितीचे चित्रीकरण आपल्या मोबाइलच्या आधारे केले होते. आज संतोषने आपल्या चित्रीकरणाला अधिक अद्ययावत करण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्याचा वापर करीत असून याकामी त्यांना त्यांचे मित्र मदत करीत आहेत. याचा लाभ सुमारे 2 लाखांवर शेतकरी घेत आहेत ही बाबच पुरेशी बोलकी आहे.

युवा शेतकऱ्यांच्या यू-ट्यूबवर आधारित यशोगाथांची नोंद आता तर विदेशातही घेतली जात आहे. सुमारे एक वर्षापूर्वी नंदकिशोर धाकड या युवा शेतकऱ्याला त्यांच्या पपई उत्पादनावर आधारित चित्रीकरण पाहून नायजेरियाच्या पपई उत्पादक शेतकऱ्यांनी 10 दिवसांच्या मार्गदर्शनपर सत्रासाठी विशेष मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले होते ही बाब विशेष प्रेरणादायी ठरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.