पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या (एससीएमआयआरटी) सब्यसाची पाणिग्रही याने पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय फिनस्विमिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले.
समर्पण आणि वचनबद्ध भावनेने त्याने मिळवलेले यश सूर्यदत्त शिक्षण संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. सब्यसाची पाणिग्रही बीबीए (आयबी) च्या द्वितीय वर्षात शिकत असून, या स्पर्धेत त्याने दोन पदकांची कमाई केली आहे.
फिनस्विमिंग स्पर्धेच्या ५० मीटर सरफेस स्विम प्रकारात सुवर्णपदक, तर ५० मीटर अपनेआ स्विम प्रकारात रौप्यपदक पटकविले आहे. सूर्यदत्त संस्थेमध्ये केवळ शैक्षणिक उपक्रमासोबत क्रीडा गुणांनाही वाव दिला जातो. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व साहाय्य पुरवले जाते.
सब्यसाची याचे खेळाप्रती असलेले समर्पण, कठोर मेहनत आणि त्याला सूर्यदत्तमधून मिळालेले प्रशिक्षण व पाठिंब्याची साथ यामुळे त्याला या स्पर्धेत चांगले यश मिळाले. सूर्यदत्त स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडेमीच्या क्रीडा समन्वयक दिलप्रीत कौर यांनी त्याला मार्गदर्शन केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पाणिग्रही याचे या यशाबद्दल अभिनंदन केले. “राष्ट्रीय फिनस्विमिंग स्पर्धेत सब्यसाचीने मिळवलेले यश सूर्यदत्त संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
सूर्यदत्तमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. तसेच क्रीडा व अन्य कलागुणांना येथे प्रोत्साहन देण्यात येते. सब्यसाची याला मिळालेले यश आमच्या विद्यार्थ्यांना सर्वार्थाने घडविण्याच्या वाचनबद्धतेचे प्रतीक आहे.
त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला खूप शुभेच्छा देतो. भविष्यात त्याचा खेळ अधिक उत्तम प्रतीचा होण्यासाठी सूर्यदत्त संस्था नियमित प्रोत्साहन व मार्गदर्शन देणार आहे.”