पुणे – शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाइन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या मराठा, कुणबी, मराठा- कुणबी या प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना व्यवसाय व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सारथी, बार्टी, टार्टी, अमृत, महाज्योती या संस्थांना प्रस्ताव पाठवले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शासनाची स्वायत्त संस्था दरवर्षी दोन वेळा शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व संगणक लघुलेखन परीक्षा आयोजित करत असते. ही परीक्षा उत्तीर्ण परीक्षार्थीला स्वतःचा व्यवसाय किंवा शासकीय नोकरी मिळण्यास मदत होते.
यामध्ये महाराष्ट्र राज्यभरातून 3 हजारांपेक्षा अधिक टंकलेखन संस्थांच्या माध्यमातून वर्षाला किमान ३ ते ४ लाख विद्यार्थी परीक्षा देतात. त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी संगणक टायपिंगचे प्रशिक्षण देण्यात येते. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होते. राज्यभरातून सुमारे ४० हजार विद्यार्थी दरवर्षी दोन वेगवेगळ्या सत्रांतून लघुलेखनाच्या परीक्षा देतात.
परीक्षार्थींचे बहुतांश पालक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतानाही केवळ स्वयंरोजगार किंवा नोकरीसाठी ते आपल्या पाल्यांना टायपिंगच्या व लघुलेखनाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. टायपिंगसाठी ६ हजार ५०० रुपये व लघुलेखनासाठी ५ हजार ३०० रुपये याप्रमाणे शुल्क द्यावे लागते.
विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दोन विषयांसाठी संबंधित विभागाकडून अनुदान मंजूर केल्यास जास्तीत जास्त परीक्षार्थ्यांना त्याचा लाभ होईल. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीनाच अर्थसाह्याची रक्कम देता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी विद्यार्थ्यांना अर्थसाह्य मिळावे, यासाठी सारथी, बार्टी, टार्टी, अमृत, महाज्योती या संस्थांना प्रस्ताव पाठविला आहे.