मुंबई : अभिनेता सोनू सूद ज्याप्रमाणे सामाजिक कार्य करतो त्याच प्रमाणे तो सामाजिक घडामोडींवर वेळोवेळी व्यक्त होताना पाहायला मिळते. दरम्यान, देशात सध्या पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या घटनेबद्दल सोनू सूदने ट्वीट केले आहे. तसेच पीडित विद्यार्थिनींबरोबर या कठीण प्रसंगात उभं राहण्यासाठी सर्वांना आवाहन केले आहे.
सोनू सूदने या प्रकाणाविषयी एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने, “चंदीगड विद्यापीठात घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या बहिणींना साथ देण्याची, त्यांच्या बरोबर उभं राहण्याची हीच वेळ आहे. एक जबाबदार समाज म्हणून आपण उदाहरण निर्माण केलं पाहिजे. ही कठीण प्रसंगाची वेळ केवळ पीडित विद्यार्थिनींसाठी नसून आपल्या सगळ्यांसाठी आहे”, असे म्हटले आहे.
Something that happened in Chandigarh University is very unfortunate. It’s time for us to stand with our sisters and set an example of a responsible society. These are testing times for us, not for the victims.
Be responsible 🙏— sonu sood (@SonuSood) September 18, 2022
पंजाबमधील मोहाली येथील चंडीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ शूट करून ते व्हायरल केल्याच्या प्रकार घडला आहे. या घटनेनंतर येथील विद्यार्थिनींनी रविवारी जोरदार आंदोलन करत निदर्शने केली. या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी अशी मागणीही विद्यार्थिनींकडून केली जात आहे. या प्रकरणी एका विद्यार्थिनींसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अटक केलेल्या विद्यार्थिनीने व्हिडीओ शूट करून ते व्हायरल केल्याचा आरोप आहे. अटक केलेल्या विद्यार्थिनीचा मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जवळपास ५५-६० विद्यार्थिनींचे व्हिडीओ व्हायरल केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर आठ विद्यार्थीनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्यापैकी एका विद्यार्थींनीची प्रकृती चिंताजनक आहे.