मुंबई – शिंदे गट आणि उद्धव ठाकरे सध्या दसरा मेळाव्यावरून आमने सामने आले आहेत. शिवाजी पार्क या मैदानावर यंदा नेमका कोणाचा मेळावा होणार याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. अशात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दसरा मेळाव्याबाबत भाष्य केलं आहे. सोलापुरात शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी विविध विषयांवर भाष्य केलं.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत पवारांना विचारले असता ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आज ती शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि दसरा मेळावा लक्षात घेऊन त्यांनी मैदानाची मागणी केली यात काही गैर नाही. मुख्यमंत्र्यांना देखील मेळावा घेण्याचा अधिकार आहे त्यासाठी त्यांनी बीकेसी मैदान मागितलं आणि त्यांना ते मिळाला. मग दुसऱ्याला परवानगी देणं आवश्यक आहे. असं स्पष्ट मत पवारांनी यावेळी व्यक्त केलं.
मोदींच्या विरोधात एक चेहरा समोर येणार का ? असा सवाल पवारांना यावेळी विचारला असता ते म्हणाले, सगळ्यांची इच्छा आहे एकत्रित काहीतरी करावं पण अद्याप तरी आम्ही कोणत्या निर्णयापर्यंत आलेलो नाही. नाना पटोलेंनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले त्यावर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असही पवार यावेळी म्हणाले.