सोलापूर – सांगोला तालुक्यातील महूद येथील जीवन खांडेकर या तरुणाने जिद्द, चिकाटी आणि स्वःकष्टाच्या जोरावर परिस्थितीवर मात करून पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात झाला. या परीक्षेत महूद येथील जीवन खांडेकर या तरुणाने उल्लेखनीय यश मिळविले आहे.
जीवनचा हा संपूर्ण प्रवास खूपच संघर्षमय आहे. वडील व आई दोघेही बैलांच्या झुली शिवण्याचे पारंपारिक काम करतात. बैलपोळा किंवा शेती संबंधीच्या उत्सव व कार्यक्रमात बैलांच्या पाठीवर सजवलेली रंगीबेरंगी झुल पांघरण्याची परंपरा आहे. शेती व्यवसायात व ग्रामीण भागात बैलांची संख्या पुर्वी मोठी होती. मात्र या आधुनिक काळात यांत्रिकीकरण वाढल्याने शेतीच्या कामातही यांत्रिकीकरण आले आहे.
सहाजिकच बैलांची संख्याही कमी झाली आहे. यामुळे झुली शिवण्याचा पारंपरिक व्यवसाय ही मोडकळीस आला आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर रवींद्र खांडेकर यांचा प्रपंच कसाबसा चालत होता. अशा कठीण परिस्थितीही त्यांनी आपल्या दोन मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांचा विवाह करून दिला.
करोना काळातील लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीमुळे या कुटुंबाचे फारच हाल झाले. स्वतः जीवन खांडेकर हा झुली शिवण्याचे काम करत होता. या झुली तो पंढरपूर येथील बाजारात जाऊन विकत होता. मात्र त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. अशातही त्याने राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला. परीक्षेच्या अभ्यासासाठी त्याने पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी घरातून फारशी मदत मिळणार नाही याची त्याला जाणीव होती. या कठीण काळात त्याचा मित्रपरिवार त्याच्या मदतीला धावून आला. या कामी मित्रपरिवाराने मोठे सहकार्य दिल्याचे जीवन खांडेकर सांगत आहे.
परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्याने पुणे येथील एका लायब्ररीत नोकरी सुरू केली. तिथेच काम करून, तिथेच राहत त्याने परीक्षेचा अभ्यास केला. मुख्य परीक्षेचा अभ्यास केवळ त्याने चाळीस दिवसांमध्ये पूर्ण केला होता. परीक्षेचा अभ्यास करत असताना मित्रपरिवार यांचे सहकार्य आणि कुटुंबाचे मानसिक पाठबळ यामुळे हे यश आपण पहिल्या प्रयत्नात मिळवू शकलो, असेही जीवन खांडेकर यांनी सांगितले.
जीवनचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण येथील शिवाजी विद्यालयात झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय घेतले.
सांगोला येथील फॅबटेक कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. जीवन खांडेकर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने त्याच्या मित्र परिवार व ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
त्याच्या या यशामुळे कष्टाने राखला शिक्षणाचा ठेवा,गरीबीच्या अंधारातही उजळला ज्ञानाचा दिवा या ओळी सार्थ ठरल्या आहेत. जीवनच्या यशाने त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यभराच्या कष्टाचे सार्थक झाले आहे.