जिल्ह्यातील धरणे, छोट्या तलावांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट

पुणे – चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्याच्या पार्श्‍वभूमीवर अशी घटना जिल्ह्यात घडू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व धरणे तसेच छोटे तलाव यांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याच्या सूचना मदत व पुर्नवसन राज्यमंत्री संजय भेगडे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.

जिल्ह्यातील धरण आणि छोट्या तलावांच्या सुरक्षेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यात लहान-मोठे पाटबंधारे प्रकल्प किती आहेत, याची माहिती भेगडे यांनी या बैठकीत विचारली असता पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याची आकडेवारी देता आली नाही.

धरण फुटण्याच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी पाटबंधारे विभागाने वेळेत सर्व्हे करावा. लहान -मोठ्या धरणांबरोबरच जिल्ह्यातील मातीच्या बंधाऱ्यांचेही सर्व्हे करावा. याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

जिल्ह्यातील ज्या धरणांमधून अथवा तलावांमधून गळती होत आहे, तसेच जी धरणे धोकादायक आहे, त्यांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट तातडीने करण्यात यावे, असेही आदेश यावेळी बैठकीत देण्यात आले.

कालव्याचीही पाहणी होणार
शहरातील दांडेकर पूल येथे गेल्या वर्षी कालवाफुटीची घटना घडली होती. त्यामुळे पुणे महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांनी तातडीने आणि संयुक्तपणे या कालव्याची पाहणी करण्याच्या सूचना भेगडे यांनी यावेळी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.