पुणे – पोटाला चिमटे काढून मुलाचे शिक्षण पूर्ण केले…मुलगा पोलिस दलात रूजू झाला…आणि कुटुंबाला कुठे सुगीचे दिवस येत नाही, तोच कर्ता मुलगा अपघातात गेला. यावेळी मित्रांनी एकजुट करत कुटुंबाला आधार देत, मयत मित्राच्या मुलींच्या शिक्षणासह उज्वल भविष्यासाठी अकरा लाख रूपये जमा केले. मुलींच्या नावाने फिक्स डिपॉझीट टाकण्याचा निर्णय घेऊन “मैत्री’ काय असते हे दाखवून दिले.
पुणे पोलीस दलातील अमलदार नितीन दिलीप शिंदे भरोसा सेलमध्ये कार्यरत होते. ते उत्तम ऍथलेटिक्स खेळाडू होते. आठ दिवसांपूर्वी सोलापूरहून पुण्याला येत असताना खासगी बसचा झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यु झाला. त्यांना दोन मुली असून, घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
पोलिस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थिती 2007 पोलिस बॅचमधील त्यांच्या मित्रांनी नितीनच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत गोळा करण्याचा निश्चय केला. सोशल मीडियाद्वारे एकमेकांना आवाहन करत प्रत्येकी 1 हजारांपासून 10 हजारांपर्यंत मदत गोळा करण्यात आली. अवघ्या काही दिवसांतच तब्बल 11 लाख रूपयांची रक्कम गोळा झाली. नितीन आमच्या आठवणीत कायमस्वरूपी राहावा, यासाठी थोडी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केल्याचे मित्रांनी सांगितले.
फिक्स डिपॉजिटद्वारे शिक्षण पूर्ण करण्याचा मानस –
मित्रांनी गोळा केलेले 11 लाख रूपये दिवंगत नितीन यांच्या मुलींच्या नावे बॅंकेत फिक्स डिपॉजिट ठेवणार आहे. त्यातून दर महिन्याला मिळणाऱ्या व्याजातून मुलींचा शैक्षणिक खर्चाला मदत होईल. दरम्यान, नितीन यांच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी अपर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी कागदपत्रे मागविली आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले.