मुंबई – सकाळी जोरदार खरेदी झाल्यामुळे निर्देशांकात बरीच वाढ झाली होती. मात्र युरोपीयन शेअर बाजारातून नकारात्मक संदेश आल्यानंतर बाजार बंद होण्याअगोदर जोरदार विक्री झाल्यामुळे दिवसाखेर शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 195 अंकांनी कमी होऊन 57,064 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 70 अंकानी म्हणजे 0.41 टक्क्यांनी कमी होऊन 17,983 अंकांवर बंद झाला.
ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या शक्यतेमुळे युरोपीयन शेअर बाजारात जोरदार विक्री झाल्याचे वृत्त आल्यानंतर भारतीय गुंतवणूकदारांनी विक्री केली. टाटा स्टील, कोटक बॅंक, बजाज ऑटो, महिंद्रा, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, इंडसइंड बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर पावर ग्रीड, टायटन, बजाज फिन्सर्व, नेस्ले, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
युरोपीयन शेअर बाजाराबरोबरच, हॉंग कॉंग, दक्षिण कोरिया, जपान या देशातील शेअर बाजारांतही विक्रीचे वारे होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल 3,332 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असल्याची आकडेवारी आज जारी करण्यात आली. जोपर्यंत करोना व्हायरस मुळे निर्माण झालेली अनिश्चितता दूर होत नाही तोपर्यंत शेअर बाजारांना खऱ्या अर्थाने दिशा मिळणार नसल्याचे विश्लेषकांनी सांगितले.