मुंबई – केंद्र इलेक्ट्रीक आणि इतर पर्यायी इंधनावरील वाहनांना चालना देत आहे. मात्र त्यासाठी परंपरागत इंधनावर आधारित इंटर्नल कंबक्शन इंजिनावर आधारित वाहनाची नोंदणी बंद केली जाणार नाही असे स्पष्टीकरण केंद्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले आहे.
गडकरी म्हणाले की, इलेक्ट्रिक बॅटऱ्याबरोबरच इथेनॉल, बायोडिझेल, सीएनजी, ग्रीन हायड्रोजन इत्यादीवरील वाहनांची विक्री व्हावी याकरिता केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. जनतेकडून या प्रयत्नांना यश मिळत आहे. या विषयावर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेने आयोजित केलेल्या परिसंवादात बोलताना गडकरी म्हणाले की, विमानामध्ये इथेनॉलचा 50 टक्के वापर व्हावा यासाठीही आम्ही प्रयत्न करीत आहोत. तसे झाले तर उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे.
आम्ही पर्यायी इंधनावरील वाहनांना चालना देत असलो तरी कुठलेही वाहन बंधनकारक करण्याचा आमचा विचार नाही. मुळात भारतातील लोक संवेदनाशील झाले आहेत आणि त्यांच्याकडूनच पर्यायी इंधनावरील वाहनांची खरेदी वाढली आहे. परदेशातील बऱ्याच इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांनी भारताला इलेक्ट्रिक वाहनावरील आयात शुल्क कमी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र सरकार सर्वसमावेशक विचार करून अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतो.
हायड्रोजनवरील वाहन खरेदी करणार
भविष्यामध्ये ग्रीन हायड्रोजनचा वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. भारत सरकार ग्रीन हायड्रोजन उत्पादनाला आणि त्यावर आधारित वाहनांना चालना देत आहे. मी स्वतः पुढील महिन्यामध्ये ग्रीन हायड्रोजनवर चालणारे वाहन खरेदी करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. भारतात 250 स्टार्टअप इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्यावर काम करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात इलेक्ट्रिक वाहने भारतामध्ये स्वस्त होण्याची शक्यता आहे.