बारामती तालुक्यात उद्या मध्यरात्रीपासून 7 दिवस कडक निर्बंध लागू

हॉस्पिटल, औषध विक्री दुकाने वगळून सर्व बंद ; दूध विक्री सकाळी 7 ते 9 पर्यंतच सूरू राहील

बारामती : बारामती तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना व घेण्यात येणा-या निर्णयाबाबतची बैठक आज तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी कोरोना नियंत्रित करण्यासाठी करण्यात येणा-या विविध उपाययोजनाबाबत सर्व यंत्रणाशी चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले की, बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे आणि ती आटोक्यात आणण्यासाठी आणखी कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे.

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, उद्या 4 मे 2021 रोजी रात्री 12:00 पासून बारामती शहरासह तालुक्यातील हॉस्पिटल, दवाखाने व औषध विक्रीची दुकाने वगळून सर्व आस्थापना/दुकाने पुढील 7 दिवस बंद राहतील. फक्त दूध विक्री सकाळी 7 ते 9 पर्यंत सुरू राहील, असे आदेश प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले. औद्योगिक वसाहती मधील ज्या कंपन्या अत्यावश्यक सेवेमध्ये येतात त्या सुरु राहतील. ज्या कंपन्यांनी कर्मचा-यांची राहण्याची सोय कंपनीच्या कार्यक्षेत्रात केली आहे त्याही कंपन्या सुरू राहतील. इतर कंपन्या शासनाने पारित केलेल्या नियमाप्रमाणे चालू राहतील.

जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी कोव्हिड विषयचे आदेश, नियम व SOP नुसार कारवाई करावी असे, आदेशही त्यांनी दिले.

सर्व आस्थापनाचे मालक, चालक आणि सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तरी सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिंस्टसिंग या त्रिसूत्रीचे व शासनाच्या सूचनांचे पालन करावे, नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये असे, आवाहनही यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.

यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, सिल्वर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरिक्षक बारामती शहर नामदेव शिंदे, पोलीस निरिक्षक ग्रामीण एम. के. ढवाण, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती सभाजी होळकर, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, व बारामती शहरातील व्यापारी, औद्योगिक वसाहतीमधील प्रतिनिधी व डॉक्टर्स आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.